Fifa World Cup Final 2022 Live Updates : ६०२९ दिवसांपूर्वी लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केलं होतं... २०१४ला वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु जर्मनीने त्याचा स्वप्न भंग केला... पण, २०२२ मध्ये अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. आज लढायचं हा एकच निर्धार घेऊन अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला अन् पहिल्या ४५ मिनिटांत गतविजेत्या फ्रान्सला पुरून उरला. अर्जेंटिनाचा आक्रमण एवढा धारधार होता की फ्रान्सचे खेळाडू बिचारे, दमलेले, हतबल दिसले.
लिओनेस मेस्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कप इतिहासात असा विक्रम आजतागायत कुणालाच जमला नाही
अर्जेंटिनाने आज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला. ९व्या मिनिटाला अर्जेंटिनाने कॉर्नर कमावला अन् फ्रान्सच्या बचावपटूंनी चांगलाच कस लागलेला पाहायला मिळाला. अर्जेंटिनाचा प्रत्येक खेळाडू आज गोलसाठी भूकेला दिसला. फ्रान्सच्या बचावपटूंना आज निवांत श्वास घ्यायलाच दिला जात नव्हता. कधीही डिफेन्सीव्ह खेळावर भर न देणाऱ्या फ्रान्सला आज अर्जेंटिनाच्या पवित्र्यामुळे कोशात जावे लागले.१९व्या मिनिटाला डी पॉलने पेनल्टी बॉक्सबाहेर फाऊल केला अन् फ्रान्सला फ्री किक मिळाला. ऑलिव्हर जिरूडने हवेत गरूड भरारी घेत हेडरद्वारे चेंडूला दिशा दिली, परंतु तो पोस्टच्या वरून गेला. २१व्या मिनिटाला डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. अपेक्षांचे प्रचंड ओझं घेऊन मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने करिष्मा करून दाखवला.
सांघिक खेळ कसा करावा याचं उत्तम उदाहरण ३६व्या मिनिटाला अर्जेंटियन खेळाडूंनी दाखवून दिले. मॅक एलिस्टर चेंडू ज्या पद्धतीने घेऊन पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला त्याला रोखण्यासाठी फ्रान्सची फौज उभी राहिली, परंतु त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलेय हे दिसताच चेंडू डी मारियाला दिला अन् अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली. मारियाने २०२२, २०१८ व २०१४ या तीनही वर्ल्ड कप स्पर्धेच्या नॉक आऊट सामन्यात गोल केले. १९३० आणि २०१८नंतर वर्ल्ड कप फायनलमध्ये ३४+ वय असलेल्या दोन खेळाडूंनी आज गोल केले. पहिल्या हाफमध्ये फ्रान्स हताश झालेले दिसले.