Fifa World Cup Final 2022 Live Updates : लिओनेल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्ष अथक परिश्रम करत होता अखेर ते आज पूर्ण झाले... वातावरण पहिल्या सेकंदापासून ते रेफरीची अखेरची शीटी वाजेपर्यंत मेस्सीमय राहिले आणि पुढील अनेक वर्ष ते तसेच राहिल याची काळजी मेस्सीने आजच्या खेळातून घेतली. २०१४ला वर्ल्ड कप विजयाचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला. लिओनेल मेस्सीचा अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीसतोड खेळ झाला अन् कायलिन एमबाप्पे एकटा भिडला. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.
फुटबॉलमध्ये अखेरच्या सेंकदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्ड कप फायनलमध्ये आली. ८०व्या मिनिटापर्यंत २-० अशा आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला १ मिनिट व ३७ सेकंदात दोन धक्के बसले. कायलिन एमबाप्पेच्या दोन गोलने फ्रान्सच्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले. ८ मिनिटांच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांच्या गोलरक्षकाने एकेक गोल रोखला अन् सामना अतिरिक्त ३० मिनिटांत गेला. पहिली १५ मिनिटे तोडीसतोड खेळ झाल्यानंतर लिओनेल मेस्सीची जादू पुन्हा चालली अन् त्याने १०८व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून दिला असे वाटत असताना एमबाप्पेने गोल करून सामना १२० मिनिटांच्या खेळात ३-३ असा बरोबरीत सोडवला
पेनल्टीचा थरार...
- कायलिन एमबाप्पे - १-० ( फ्रान्स )
- लिओनेल मेस्सी - १-१ ( अर्जेंटीना)
- किंग्स्ली कोमन ( संधी गमावली ) - १-१ ( फ्रान्स)
- पॉलो डिबाला - २-१ ( अर्जेंटिना)
- आरेलोना टी चौमेनी ( संधी गमावली ) - १-२ ( फ्रान्स)
- लिएंड्रो पेरेडेस - ३-१ ( अर्जेंटीना)
- रँडल कोलो मौनी - २-३ ( फ्रान्स)
- गोंझालो मॉटेई - ४-२ ( अर्जेंटीना)
- अर्जेंटिना सहाव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळतेय आणि जर्मनीने सर्वाधिक ८ वर्ल्ड कप फायनल खेळले आहेत. अर्जेंटिनाने १९७८ व १९८६ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.
अर्जेंटिनाने आज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला. ९व्या मिनिटाला अर्जेंटिनाने कॉर्नर कमावला अन् फ्रान्सच्या बचावपटूंनी चांगलाच कस लागलेला पाहायला मिळाला. १९व्या मिनिटाला डी पॉलने पेनल्टी बॉक्सबाहेर फाऊल केला अन् फ्रान्सला फ्री किक मिळाला. ऑलिव्हर जिरूडने हवेत गरूड भरारी घेत हेडरद्वारे चेंडूला दिशा दिली, परंतु तो पोस्टच्या वरून गेला. २१व्या मिनिटाला डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. अपेक्षांचे प्रचंड ओझं घेऊन मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने करिष्मा करून दाखवला. सांघिक खेळ कसा करावा याचं उत्तम उदाहरण ३६व्या मिनिटाला अर्जेंटियन खेळाडूंनी दाखवून दिले. मॅक एलिस्टर चेंडू ज्या पद्धतीने घेऊन पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला त्याला रोखण्यासाठी फ्रान्सची फौज उभी राहिली, परंतु त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलेय हे दिसताच चेंडू डी मारियाला दिला अन् अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली. पहिल्या हाफमध्ये फ्रान्स हताश झालेले दिसले.
फ्रान्सच्या या कमबॅकने अर्जेंटिनाचे खेळाडू बिथरले आणि त्यांच्याकडून आता धक्काबुक्की होऊ लागली. १०४व्या मिनिटाला मेस्सीने भन्नाट गोल केलाच होता, परंतु फ्रान्सच्या खेळाडूंनी सुरेख ब्लॉक केला. पुढच्याच मिनिटाला अकुनाने फ्रान्ससाठी आणखी एक गोल रोखला अन् यावेळेस गोल प्रयत्न करणारा लौटारो मार्टिनेझ होता. त्याने रेफरीकडे पेनल्टीची मागणी केली. १०७व्या मिनिटाला मेस्सीचा गोल रोखला गेला. पुढच्याच मिनिटाला अर्जेंटिनाने गोल केला.. मार्टिनेझचा तो प्रयत्न गोलरक्षकाने रोखला, परंतु चेंडूवर ताबा राखता न आल्याने मेस्सीला गोल संधी मिळाली आणि अर्जेंटिनाने ३-२ अशी आघाडी घेतली. ११६ व्या मिनिटाला हँड बॉलमुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली एमबाप्पेने त्यावर गोल करून सामना पुन्हा ३-३ असा बरोबरीत आणला.
वर्ल्ड कप विजेते संघब्राझील - 5 (1958, 1962, 1970, 1994, 2002 )जर्मनी - 4 (1954, 1974*, 1990, 2014)इटली - 4 (1934*, 1938, 1982, 2006)अर्जेंटीना - 3 (1978*, 1986, 2022)फ्रान्स - 2 (1998*, 2018)उरुग्वे - 2 (1930*, 1950)इंग्लंड - 1 (1966*)स्पेन - 1 (2010)