कतार येथे सुरू असलेली फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे आणि आजपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. जगभरात पाहिल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा भारतातही मोठा चाहता वर्ग आहे आणि भारतातून अनेक चाहते कतारमध्ये आपापल्या संघांना चिअर करण्यासाठी पोहोचले आहेत. पण, कतारच्या स्टेडियममध्ये हिरो इंडियन सुपर लीगचे ( आयएसएल) रंगही दिसत आहेत. कतारमध्ये भारतीय चाहते आयएसएलमधील त्यांच्या फेव्हरिट संघांची जर्सी घालून फुटबॉल वर्ल्ड कपचा आस्वाद घेताना दिसत आहेत. फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये इंडियन सुपर लीगचे रंग पाहायला मिळत आहेत.
जवळपास सर्व हिरो आयएसएल क्लबच्या चाहत्यांनी क्लबबद्दलची त्यांची उत्कटता दर्शविल्यामुळे, फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांत भारतीय फुटबॉलचे रंग पाहायला मिळत आहेत.कतारमधील अल जनुब स्टेडियममध्ये, उरुग्वे आणि घाना यांच्यातील सामन्यादरम्यान, केरळ ब्लास्टर्सच्या चाहत्यांचा एक गट ब्लास्टर्सची जर्सी घालून आणि उरुग्वेचा ध्वज फडकावताना दिसला. त्यांच्याजवळ एक लहान पोस्टर देखील होते ज्यात लिहिले होते, “आमच्या जादूगार उरुग्वेयन खेळाडूसाठी उरुग्वेला समर्थन देत आहोत,” त्याच्या शेजारी KBFC स्टार स्ट्रायकर, उरुग्वेयन एड्रियन लुना यांचे चित्र आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने आयोजित करणाऱ्या जवळपास सर्वच ठिकाणी इतर अनेक चाहते दिसले.
वेस्ट ब्लॉक ब्लूजचे सदस्य, सुनील मरकल, एज्युकेशन सिटी स्टेडियममध्ये उपस्थित होते जेथे मोरोक्कोने २०१०च्या वर्ल्ड कप विजेत्या स्पेनला पेनल्टीवर नॉकआउट केले. सुनील बंगळुरू एफसीची जर्सी घालून तेथे उपस्थित होता आणि त्याच्याभोवती मोरोक्कन चाहते होते.
''बंगळुरू एफसी हा माझ्या हृदयाच्या जवळ असलेला क्लब आहे आणि मी कोणत्याही सामन्यात हजेरी लावतो तेव्हा माझ्यासोबत बंगळुरू एफसीची जर्सी किंवा स्कार्फ असतो. ब्लूज ही माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे,” असे नील म्हणाला, ज्याला मोरोक्कन चाहत्यांने त्याच्या जर्सी आणि क्लबबद्दल उत्सुकतेने प्रश्न विचारले.
"मोरोक्कोचे बरेच चाहते जिज्ञासू होते कारण त्यांच्या लाल रंगाच्या जर्सीत मी वेगळी जर्सी घातलेला एकमेव व्यक्ती होतो, म्हणून मी त्यांना बंगळुरू एफसी बद्दल सांगितले," असे तो म्हणाला.
हिरो आयएसएलच्या आगमनानंतर अनेक चाहत्यांनी स्थानिक आणि देशांतर्गत फुटबॉलशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट झाले आहेत. भारतीय फुटबॉलमधील उत्कटता आणि स्वारस्य सध्याच्या हिरो आयएसएल हंगामात देखील दिसून आले आहे, कारण चाहत्यांना दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर त्यांच्या संघांना स्टेडियममध्ये खेळताना पाहण्याची संधी मिळाली आहे.
केरळा ब्लास्टर्स एफसी आणि ईस्ट बंगाल एफसी यांच्यातील नवीन हंगामाची सुरुवातीच्या लढतीचे सर्व तिकीटं विकली गेली होती. भारताच्या फुटबॉल प्रवासातील त्यांची गुंतवणूक दर्शविण्यासाठी संपूर्ण हंगामात चाहते मोठ्या संख्येने आले आहेत आणि आता या वचनबद्धतेला जागतिक स्तरावर नेण्याची त्यांची तयारी दर्शविली आहे.