मॉस्को : डोपिंगमध्ये वादग्रस्त ठरलेला, गेली अनेक वर्षे सुमार प्रदर्शनामुळे फिफा रँकिंगमध्ये घसरलेल्या यजमान रशियाला उद्या सौदी अरेबियाविरुद्ध विजयाची आशा आहे. यजमान असल्यामुळे रशियाला या विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला. रशियाचे सध्याचे मानांकन ७० असून या स्पर्धेतील ३२ संघांमध्ये त्यांचा क्रमांक सर्वांतखाली आहे. ६७ वी रँकिंग असलेल्या सौदी अरबविरुद्ध रशिया उद्घाटनाचा सामना खेळणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या आशियाई संघाने सलामीचा सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.रशिया व सौदी अरब लुझनिकी स्टेडियममध्ये भिडतील. येथेच स्पर्धेचा अंतिम सामनाही होईल. रशियाला ‘अ’ गटातून बाद फेरीमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन उपस्थित राहण्याची शक्यता आहे.आतापर्यंत रशियाचे प्रदर्शन चांगले झालेले नाही. स्पर्धेतील सर्व मैत्रीपूर्ण सामने रशियाने गमावले आहेत. रशियाने आपला अखेरचा विजय आॅक्टोबर २0१७ मध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध साजरा केला होता. रशियाने आपल्या मायभूमित कोरियाचा ४-२ ने पराभव केला होता. दरम्यान, २0१६ मधील युरो कप आणि २0१७ मधील फिफा कन्फेडरेशन चषक स्पर्धेत त्यांना साखळी सामन्यातही विजय प्राप्त करता आला नव्हता. (वृत्तसंस्था)
विजयी सलामीचा रशियाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 5:26 AM