Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंनी क्लब व देशासाठी अनेक जेतेपदं नावावर केली आहेत, परंतु या दोघांच्या नावावर वर्ल्ड कप नाही. कतारमध्ये सुरू असलेला वर्ल्ड कप हा कदाचित दोघांचाही अखेरचा आहे आणि आपल्या ट्रॉफीच्या त्या कपाटात दोघांनाही वर्ल्ड कप पाहायचा आहे. त्यामुळे दोघंही प्रयत्नशील आहेत. अर्जेंटिनाला मात्र पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाकडून हार मानावी लागली आणि आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा रोनाल्डोवर खिळल्या. त्यात रोनाल्डोने अप्रतिम गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली होती, परंतु रेफरीने तो गोल नाकारला. यावरून पोर्तुगालच्या फॅन्सनी सोशल मीडियावर निषेध नोंदवला.
- २०१४च्या ग्रुप स्टेजमध्ये पोर्तुगाल वि. घाना यांच्यात लढत झाली होती आणि पोर्तुगालने २-१ असा विजय मिळवला होता. त्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने विजयी गोल केला होता.
- वर्ल्ड कप स्पर्धेतील मागील १४ पैकी ३ सामनेच ( ६ अनिर्णित व ५ पराभव) पोर्तुगालला जिंकता आले आहेत. २००६मध्ये त्यांना बाद फेरीत शेवटचा विजय ( १-० वि. नेदरलँड्स) मिळवला होता.
- घानाने २०१०मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती.
आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष्य ३७ वर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावरच होते. कारकिर्दीतील अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोनाल्डोची कामगिरी कशी होते आणि तो वर्ल्ड कप उंचावतो का, याचीच सर्वांना उत्सुकता आहे. घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने पहिल्या हाफमध्ये लौकिकास साजेसा खेळा केला, परंतु पोर्तुगालला गोल करता आला नाही. ३१ व्या मिनिटाला ख्रिस्तीयानो रोनाल्डोने गोल केला होता, परंतु चेंडू मिळवण्यासाठी त्याने घानाच्या खेळाडूला धक्का दिल्याने रेफरीने तो गोल अमान्य ठरवला. पोर्तुगालने पहिल्या हाफमध्ये चेंडूवर सर्वाधिक ताबा राखताना ४०० पासेस दिले.