समारा - पेनल्टी शूटआऊट मधील थरारक विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंडच्या संघाने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत रणनितीची योग्य अंमलबजावणी करताना स्वीडनला 2-0 अशी हार मानण्यास भाग पाडले. 1990 नंतर प्रथमच इंग्लंडने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात इंग्लंडने पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या तीस मिनिटांच्या रटाळ खेळानंतर 30व्या मिनिटाला हॅरी मॅग्युरेचाने गोल केला. त्यानंतर सामन्यातील चढाओढ वाढली. दोन्ही संघाकडून त्यानंतर आक्रमक खेळाला सुरूवात केली. पण, स्वीडनला बरोबरी मिळवण्यात अपयश आले. 2002च्या विश्वचषक स्पर्धेनंतर उपांत्यपूर्व फेरीत गोल करणारा मॅग्युरेचा हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला. 16 वर्षांपूर्वी मिचेल ओवेन यांनी उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलविरूद्ध गोल केला होता. इंग्लंड आणि स्वीडन यांच्यात आतापर्यंत 24 सामने झाले असून उभय संघांनी अनुक्रमे 8 व 7 विजय मिळवले आहेत, तर 9 सामने बरोबरीत सुटले. त्यात इंग्लंडने पहिल्या सत्रात खाते उघडून आणखी एका विजयाच्या दिशेने कूच केली होती. दुस-या सत्रात इंग्लंडचेच वर्चस्व जाणवले. चेंडू अधिक काळ हा स्वीडनच्याच बचावक्षेत्रात खेळता ठेवत इंग्लंडने सातत्याने गोलचे प्रयत्न सुरू ठेवले. अखेरीस 59व्या मिनिटाला इंग्लंडला प्रतिस्पर्धीची बचावफळी भेदता आली. जेस अलीच्या क्रॉसपासवर डेल अलीने हेडरव्दारे गोल करून इंग्लंडला फ्रंटसीटवर बसवले. त्यानंतर स्वीडनकडून झालेले प्रयत्न गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने सुरेखरित्या अडवले. आघाडीनंतरही इंग्लंडच्या आक्रमणाची धार बोथट झाली नाही. स्वित्झर्लंडला नमवून अंतिम आठमध्ये प्रवेश करणारा स्वीडनचा संघ या लढतीत गोंधळलेला दिसला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते.