सोची - क्रोएशिया आणि रशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील लढत निर्धारीत वेळेतही 1-1 अशा बरोबरीत सुटली. अतिरिक्त पाच मिनिटांत कोणालाही विजयी गोल करता आला नाही.
विश्वचषक फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत क्रोएशियाने पिछाडीवरून मुसंडी मारताना यजमान रशियाला पहिल्या सत्रात 1-1 असे बरोबरीत रोखले होते. उपांत्यपूर्व फेरीत आक्रमक सुरूवात करून पहिला गोल नोंदवून आघाडी घेण्याच्याच रणनितीने दोन्ही संघ मैदानात उतरले होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच सामन्यावर नजर खिळून राहिली. धक्कातंत्र देत इथवर धडकलेल्या क्रोएशियाने चेंडूवरील ताबा आणि अचुकतेच्या बाबतीत रशियापेक्षा वरचढ खेळ केला. मात्र डेनीस चेरिशेव्हच्या अप्रतिम गोलने क्रोएशियाची एकाग्रता भंग केली. योग्य ताळमेळ आणि निर्णयक्षमता याच्या जोरावर चेरिशेव्हने पेनल्टी क्षेत्राबाहेरून क्रोएशियाच्या दोन बचावपटूंना चकवत सुरेख गोल केला. चेरिशेव्हने टोलावलेल्या चेंडूच्या दिशेचा गोलरक्षकाने अंदाज बांधण्याआधीच हा गोल झाला होता. त्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूंचे मनोबल खचले आणि त्यांच्याकडून फाउल झाले. पण 39व्या मिनिटाला आंद्रेज क्रॅमनीचच्या हेडरव्दारे केलेल्या गोलने क्रोएशियाने बरोबरी साधली. क्रोएशियाच्या या पलटवाराने रशियाचे प्रशिक्षक प्रचंड वैतागले. दुस-या सत्रात दोन्ही संघांनी संयमाने खेळ केला. कोणतीही घाई अंगलट येऊ शकते याची कल्पना असल्याने दोन्ही संघ सावध खेळावर भर दिलेला. अधुनमधुन आक्रमण करत होते, बचावपटूंच्या सुरेख खेळासमोर त्यांना यश मिळवता येत नव्हते. सामन्याच्या 60व्या मिनिटाला क्रोएशियाची आघाडी थोडक्यात हुकली. रशियन पेनल्टी क्षेत्रात क्रोएशियाच्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमणाने गोलरक्षक अॅकिनफिव्हलाही पुढे येण्यास भाग पाडले. हीच संधी हेरून इव्हान पेरिसीचने चेंडू शितीफीने गोलजाळीच्या दिशेने तटवला. पण, क्रोएशियाचे नशीब खराब असल्याने चेंडू गोलपोस्टवर आदळून माघारी फिरला. यावर क्रोएशियाच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांना विश्वास बसेनासा झाला. तर रशियाच्या खेळाडूंनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर बराच काळ रशियाचे खेळाडू दबावाखाली दिसले. तरीही त्यांनी यजमानांना साजेसा खेळ केला. पण अखेरच्या दहा मिनिटात त्यांच्यावरील दडपण अधिक वाढले. क्रोएशियाचा खेळ वरचढ ठरत असताना प्रेक्षक रशियाच्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे काम करत होते. खेळांडूपेक्षा रशियाचे प्रशिक्षक प्रचंड तणावात दिसले. पण दोघांनी संयमाने खेळ केला.