कजान - सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझिलच्या वाट्याला पहिल्या सत्रात अपयश आले. बेल्जियमचा गोलरक्षक थिबाऊट कोर्टोइस आणि बचावपटूंनी अप्रतिम सेव्ह करत ब्राझिलला पहिल्या सत्रात 0-2 अशा पिछाडीवर टाकले.
बेल्जियम आणि ब्राझील या दोन्ही संघानी सुरूवातीपासून आक्रमणावरच भर दिला होता. बेल्जियमचे खेळाडू माजी विजेत्यांवर भारी पडताना पाहायला मिळाले. सामन्याच्या 13व्या मिनिटाला बेल्जियमने आघाडी घेतली. व्हिसेंट कम्पनीच्या कॉर्नर किकवरील चेंडू हेडरव्दारे गोलजाळीवरून टोलावण्याचा ब्राझिलच्या फर्नांडीनोचा प्रयत्न फसला. चेंडू त्याच्या हाताच्या कोप-याला लागून जलद गतीने गोलजाळीत विसावला आणि प्रतिस्पर्धीच्या स्वयंगोलवर बेल्जियमने आघाडी घेतली. त्यानंतर सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझीलच्या खेळाडूंना यशप्राप्ती होत नव्हती. 31व्या मिनिटाला डेव्हीड ब्रुयनेने लाँग रेंजवरून अप्रतिम गोल करत बेल्जियमची आघाडी 2-0 अशी भक्कम केली.