सोची - विश्वचषक फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत क्रोएशियाने पिछाडीवरून मुसंडी मारताना यजमान रशियाला पहिल्या सत्रात 1-1 असे बरोबरीत रोखले.
उपांत्यपूर्व फेरीत आक्रमक सुरूवात करून पहिला गोल नोंदवून आघाडी घेण्याच्याच रणनितीने दोन्ही संघ मैदानात उतरले होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच सामन्यावर नजर खिळून राहिली. धक्कातंत्र देत इथवर धडकलेल्या क्रोएशियाने चेंडूवरील ताबा आणि अचुकतेच्या बाबतीत रशियापेक्षा वरचढ खेळ केला. मात्र डेनीस चेरिशेव्हच्या अप्रतिम गोलने क्रोएशियाची एकाग्रता भंग केली. योग्य ताळमेळ आणि निर्णयक्षमता याच्या जोरावर चेरिशेव्हने पेनल्टी क्षेत्राबाहेरून क्रोएशियाच्या दोन बचावपटूंना चकवत गोलजाळीच्या दिशेने टोलावलेल्या चेंडूच्या दिशेचा गोलरक्षकाने अंदाज बांधण्याआधीच गोल झाला होता. त्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूंचे मनोबल खचले आणि त्यांच्याकडून फाउल झाले. पण 39व्या मिनिटाला आंद्रेज क्रॅमनीचच्या हेडरव्दारे केलेल्या गोलने क्रोएशियाने बरोबरी साधली. क्रोएशियाच्या या पलटवाराने रशियाचे प्रशिक्षक प्रचंड वैतागले. इतिहास रशियाच्या बाजूनेमागील पाच फिफा विश्वचषक स्पर्धांमधील उपांत्यपूर्व फेरीचा इतिहास हा रशियाचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. मागील पाचही विश्वचषक स्पर्धांच्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान संघाला विजय मिळवण्यात यश आलेले आहे. याआधी इटली (1990), फ्रान्स ( 1998), दक्षिण कोरिया ( 2002), जर्मनी ( 2006) आणि ब्राझील ( 2014) यांनी ही कामगिरी केली आहे. यापूर्वी क्रोएशियाला विश्वचषक स्पर्धेत दोनवेळा यजमानांचा सामना करावा लागला होता आणि त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 1998 मध्ये फ्रान्सने उपांत्य फेरीत 2-1 असा, तर 2014 मध्ये साखळी फेरीत ब्राझिलने साखळी गटात 3-1 असा विजय मिळवला होता.