Fifa World Cup, Ronaldo : फ्रान्स, ब्राझील यांच्यानंतर पोर्तुगालने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या राऊंड १६ मध्ये आपले स्थान पक्के केले. पोर्तुगालने काल झालेल्या सामन्यात उरुग्वेवर २-० असा विजय मिळवला. ब्रुनो फर्नांडेसने या सामन्यात दोन्ही गोल केले, परंतु कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने ( Cristiano Ronaldo) पहिल्या गोलवर दावा केला. त्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. आता यात इंग्लंडचा खेळाडू ख्रिस वोक्सने उडी मारली आहे आणि त्याने क्रिकेटप्रमाणे इथेही DRS चा वापर का करत नाही, असा सवाल केला आहे.
पोर्तुगालला २०१८ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत उरुग्वेने स्पर्धेबाहेर फेकले होते. त्यामुळे ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा संघ त्याची परतफेड नक्कीच करायला उत्सुक होता. पण उरुगवेने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बचावपटू उतरवले. तरीही पोर्तुगालने चेंडूवर सर्वाधिक ताबा राखून गोल करण्याचे प्रयत्न सातत्याने केले. रोनाल्डोने पहिल्या १० मिनिटांत दोन संधी निर्माण करून दिल्या, दुर्देवाने पोर्तुगालला खाते उघडता आले नाही. ३२व्या मिनिटाला उरुगवेच्या व्हेसिनोने गोल करण्याची छान संधी गमावली. पोर्तुगालचा गोलरक्षक आडवा आला आणि उरुगवेचा गोल रोखला. ही पहिल्या हाफमधील सर्वात सोपा चान्स होता. वर्ल्ड कप स्पर्धेत पोर्तुगालला तिसऱ्यांदा पहिल्या हाफमध्ये एकही ऑन टार्गेट प्रयत्न मारता आला नाही.
५४ व्या मिनिटाला पोर्तुगालने खाते उघडले. फर्नांडेसच्या पासवर रोनाल्डोने हेडरद्वारे चेंडू जाळीत पाठवण्याचा प्रयत्न केला अन् प्रथमदर्शनी चेंडू रोनाल्डोच्या हेडरमुळेच गोलजाळीत गेल्याचे सर्वांना वाटले. रोनाल्डोनेही विक्रमी गोल केल्याचं सेलिब्रेशन सुरू केलं. पण, रिप्ले पाहिल्यानंतर हा गोल फर्नांडेसचाच असल्याचे समोर आले, परंतु रोनाल्डो तरीही या गोलवर दावा करताना दिसला. उरुग्वेने ७३ व्या मिनिटाला दोन एक्के मैदानावर उतरवले. लुईस सुआरेझ आणि गोमेज यांनी मैदानात उतरताच आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली. गोमेजचा प्रयत्न पोस्टला लागून अयशस्वी ठरला तर सुआरेझचाही फ्री किकवरील प्रयत्न फसला. पण उरुगवेच्या खेळातील गती अचानक वाढली. ९० व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टी मिळाली आणि त्यावर फर्नांडेसने गोल करताना पोर्तुगालच्या २-० अशा विजयासह राऊंड १६ मधील प्रवेशही पक्का केला. उरुगवेचे खेळाडू पेनल्टीच्या निर्णयावर नाखूष झाले.
पोर्तुगालने २-० असा विजय मिळवून राऊंड १६ मध्ये जागा पक्की केली. हा ४-० असा विजय ठरला असता, परंतु फर्नांडेसचा ९०+८ मिनिटातील प्रयत्न उरुगवेच्या गोलीने रोखला आणि एक प्रयत्न पोस्टला लागून अयशस्वी ठरला. दोन्ही गोल पहिला गोलही ब्रुनो फर्नांडेसच्या नावावर.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"