मेर्थीर टायफिल - रशियात नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेचा ज्वर अजूनही कायम असलेला पाहायला मिळत आहे. या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा पराक्रम केला. 1966चे जेतेपद आणि 1990च्या चौथ्या स्थानानंतरची इंग्लंडची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या स्पर्धेत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने गोल्डन बुटाचा मान पटकावला. त्याने सर्वाधिक 6 गोल केले. ग्रॅहम शॉर्ट या कोरीव काम करणा-या प्रसिद्ध व्यक्तीने केनच्या या कामगिरीला आपल्या कलाकृतीतून सलाम ठोकला आहे.
कोणत्याही वस्तूवर अगदी सूक्ष्म कोरीव काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शॉर्ट यांनी 5 युरोच्या नोटेवर केनच्या चेह-याची हुबेहुब प्रतिकृती रेखाटली आहे. अशा सहा नोटा त्यांनी तयार केल्या आहेत. गोष्ट इथेच संपत नाही, तर त्यांनी या नोटांपैकी एक नोट मेर्थीर टायफिल येथील एका मॉलमध्ये दिली आहे आणि मॉल मालकाला ती दैंनदिन चलनात वापरण्यास सांगितले. हे सर्व झाल्यानंतर शॉर्ट यांनी ही नोट कोणाकडे असेल त्यांनी परत करावी आणि त्याबदल्यात बक्षीस घेऊन जावे, असे आवाहन केले आहे.
शॉर्ट यांनी या नोटेसाठी जाहीर केलेली बक्षीस रक्कम तुम्हाला चक्रावून टाकेल. त्यांनी 5 युरोच्या या नोटसाठी 50 हजार युरो ( 44,90,881 भारतीय रक्कम) बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे हेरी केनच्या या नोटेचा भाव चांगलाच वधारला आहे. शॉर्ट यांनी त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच मेर्थीर टायफिल येथे प्रथम वाटली. आता उर्वरीत नोटा लंडन आणि आयर्लंड येथे वाटणार असल्याचे शॉर्ट यांनी जाहीर केले.