नवी दिल्ली : चीनविरुद्ध १३ आॅक्टोबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्याच्या तयारीसाठी अधिक वेळ न मिळाल्याने भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी नाराजी व्यक्त केली.भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी चीनचा दौरा करणार आहे. ही लढत सुझोऊ आॅलिम्पिक स्पोर्ट््स सेंटरमध्ये होईल. उभय संघांदरम्यान अखेरची लढत १९९७ मध्ये कोच्ची येथे नेहरू कप स्पर्धेत झाली होती. चीनचा संघ फिफा क्रमवारीत भारताच्या तुलनेत वरच्या स्थानी आहे. या लढतीसाठी केवळ दोन दिवसाचा अवधी मिळाल्यामुळे कॉन्स्टेनटाईन नाराज आहेत.जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये संघाच्या सराव सत्रादरम्यान कॉन्स्टेनटाईन म्हणाले, ‘नक्कीच ही अडचण आहे. आम्हाला आणखी काही दिवसांचा अवधी मिळायला हवा होता. भविष्यात आम्हाला सामन्यांसाठी अधिक वेळ मिळायला हवा.’ संघातील अनेक खेळाडू इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत खेळत आहे. कर्णधार सुनील छेत्री ७ आॅक्टोबर रोजी बेंगळुरु एफ सीतर्फे जमशेदपूर एफसीविरुद्ध सामना खेळला होता. संघ केवळ दोन दिवसांच्या सराव शिबिरानंतर चीनला जात आहे. (वृत्तसंस्था)
सरावासाठी अधिक वेळ न मिळाल्याने फुटबॉल प्रशिक्षक कॉन्स्टेनटाईन नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 5:29 AM