नवी दिल्ली : माजी दिग्गज खेळाडू बायचुंग भूतियाविरुद्ध कल्याण चौबे ही थेट लढत अखिल भारतीयफुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनुभवायला मिळणार आहे. ही निवडणूक आज, शुक्रवारी होणार असून, बाजी कुणीही मारली तरी एआयएफएफला ८५ वर्षांत प्रथमच पहिला खेळाडू अध्यक्ष मिळणार हे नक्की.
महान खेळाडू असलेला ४५ वर्षांचा बायचुंग आणि मोहन बागान तसेच ईस्ट बंगालचे माजी गोलकीपर कल्याण चौबे यांच्यात थेट लढत होईल. चौबे यांना गुजरात आणि अरुणाचल प्रदेश राज्य संघटनांनी पाठिंबा दिला असल्याने चौबे विजयी होतील, असे मानले जात आहे. चौबे हे प. बंगाल भाजपचे नेतेदेखील आहेत. क्रीडा संघटनांमध्ये भाजपचे वर्चस्व असल्यामुळे प्रभावशाली भाजप नेते चौबे यांच्या विजयासाठी सक्रिय झाले आहेत. ईशान्येकडील भाजपचे मोठे नेते चौबे यांच्यासाठी मेहनत घेत असून, याच कारणांमुळे भुतियाला त्याचे गृहराज्य सिक्कीम संघटनेचादेखील पाठिंबा मिळू शकलेला नाही. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस नेते मानवेंद्रसिंग विरुद्ध एन. ए. हारिस, तर कोषाध्यक्षपदासाठी गोपालकृष्ण कोसाराजू आणि कीपा अजय रिंगणात आहेत. मतदानात ३४ राज्य संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील.