- सुरेश लोखंडे
ठाणे, दि. 13 - एकाच दिवशी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे आणि तंत्रनिकेतनमध्ये 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यातही शाऴा, महाविद्यालयांमध्ये हा महोत्सव रंगणार असल्याचे स्काऊट आणि गाईडचे ठाणे जिल्हा संघटन आयुक्त संतोष दुसाने यांनी सांगितले.
या महोत्सवात राज्यातील अनेक फुटबॉल खेळाडू भाग घेणार आहेत. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी, आमदार-खासदार आदींच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी प्रमुख कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अगदी तालुका स्तरावर देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील अनेकविध घटकांनी त्याला सक्रिय पाठिंबा दिला आहे. परिणामी, या दिवशी अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे. या क्रीडा क्रांतिकारी योजनेच्या निमित्ताने शाळा-महाविद्यालयांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शैक्षणिक-क्रीडा संकुलांमध्ये विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी या मैदानांवरील उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. तसेच, शुभेच्छा भेटकार्ड, पोस्टर, चित्रकला-निबंध आदींच्या माध्यमातून संपूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये फुटबॉलमय वातावरण दिसून येणार आहे.
मुंबई शहर - अवघ्या एका मुंबई शहरामध्ये जवळपास एक लाखांहून अधिक मुले-मुली फुटबॉल खेळणार आहेत. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे २०० मैदानांची आखणी करण्यात आली आहे. बॉम्बे जिमखाना येथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालय येथे सकाळी ९ वाजता प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर दिवसभर मुंबईतील मैदानांवर फुटबॉलचे सामने रंगणार आहेत. विफा, एमडीएफए, खासगी क्लब, फुटबॉल मैदाने अशा सर्व ठिकाणी विविध संस्था-संघटनांच्या सहकार्याने त्या दिवशी मुंबई फुटबॉलमय होणार आहे.
ठाणे-उपनगर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसमवेत आदिवासी पाड्यांवरदेखील फुटबॉलचा किक-ऑफ होणार आहे. रायगड नगराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये नगरपालिकांच्या सर्व शाळांमध्ये फुटबॉलचे सामने खेळ रंगणार आहे. सर्व कर्मचारी वर्गाने आपल्याजवळील शाळांमध्ये जाऊन त्यामध्ये सहभागी होण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांच्यावतीने जारी करण्यात आला आहे. अलिबागमध्ये तनिष्का महिला गटांचे फुटबॉल सामने होणार आहेत. सुमा शिरूर हिच्यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सहभाग त्याचे आकर्षण ठरणार आहे.
सिंधुदुर्ग - विद्यार्थ्यांचा बीच फुटबॉल याच्यासोबतच केंद्रीय कारागृहातील कर्मचारी आणि कैदी यांच्यातील फुटबॉल सामना आकर्षण ठरणार आहे.
सातारा-सांगली - खासगी फुटबॉल संघांसह हजारोंच्या संख्येने विद्यार्थी मैदानावर फुटबॉल खेळणार आहेत. सातारा येथे माध्यमांच्या मदतीने संपूर्ण जिल्ह्यात फुटबॉलवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शाळेला मैदानच नसल्याने खेळापासून वंचित राहणारी सुमारे आठ हजार मुले-मुली सांगलीच्या शिवाजी स्टेडियम या मुख्य मैदानावर येऊन फुटबॉलचा आनंद लुटणार आहेत.
कोल्हापूर - कोल्हापूरचे फुटबॉल प्रेम सर्वश्रुतच आहे. त्यात भर म्हणजे, कोल्हापूरचा अनिकेत जाधव हा १७ वर्षांखालील संघाच्या माध्यमातून विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळेच, सर्व फुटबॉल संघांसह शहरभर त्याच्या अभिनंदनाचे व महाराष्ट्र मिशन वन मिलियनचे फलक झळकत आहेत. गणेशोत्सव मिरवणुकीत त्यावर आधारित देखावे होते. १५ सप्टेंबरला छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत न्यू पॅलेस मैदानावर ६० संघांचे सामने रंगणार असून त्यासाठी ६० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच, शहरभर तालमी-मंडळांमधील फुटबॉल खेळण्यात येणार आहे.
सोलापूर - सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये इंटर क्लास स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे अंतिम सामने १५ तारखेला होणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून पार्क स्टेडियमवर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी व महापालिका या कार्यालयांमधील कर्मचारी-अधिकारीवर्गाची फुटबॉल मॅच हे आकर्षण ठरणार आहे.
पुणे - पुण्यातील सव्वाशेहून अधिक फुटबॉल क्लब या उपक्रमात सहभागी होत आहेत. मध्यवर्ती कारागृहातील फुटबॉल सामना, पोलिसांचा फुटबॉल सामना, मुला-मुलींना शाळेत सोडण्यास येत असलेल्या रिक्षावाले काकांचा फुटबॉल सामना आणि फ्री-स्टाईल फुटबॉल जगलिंग या क्रीडाप्रकाराची प्रात्यक्षिके हे आकर्षण ठरणार आहेत. फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत जगभरातील टॉप २५ मध्ये स्थान मिळविलेला राजेश राठी या युवकाची प्रात्यक्षिके हे शनिवारवाड्यासमोरील या महोत्सवात आकर्षण ठरणार आहे. व्यापारी पेठांमधील माथाडी-मापारी हेदेखील फुटबॉलचा आनंद लुटणार आहेत.
नाशिक - नाशिक विभागातील सुमारे एक लाख मुले-मुली १५ सप्टेंबरला फुटबॉल महोत्सवांमध्ये सहभागी होणार आहेत. यापूर्वीच दर रविवारी होत असलेल्या फुटबॉल स्ट्रीट या जळगावमधील उपक्रमाने या विभागात महाराष्ट्र मिशन वन मिलियनबाबत जनजागृती केली आहे. आता १५ सप्टेंबरला नंदुरबारमधील आदिवासी पाडे, आश्रमशाळांचे विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. त्यांना यापूर्वीच फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. झोपडपट्ट्यांमधील मुला-मुलींनीदेखील फुटबॉल प्रशिक्षण देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिच्यासह अनेक पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.
औरंगाबाद - विभागीय क्रीडा संकुलामध्ये २० हजारांहून अधिक मुले-मुली फुटबॉलचा आनंद लुटणार आहेत.
उस्मानाबाद - सुमारे ५ हजार मुला-मुली आणि कार्टुन्सचा समावेश असलेली फुटबॉल रॅली हे आकर्षण ठरणार आहे.
अमरावती - हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासह विभागीय क्रीडा संकुलामध्ये मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर - विदर्भातील गोंदिया-गडचिरोली आदी दुर्गम भागांमध्येदेखील फुटबॉल पोचविण्यात आले आहेत. आता १५ तारखेला नागपूरच्या मुख्य कार्यक्रमांसह विदर्भातील या दूरस्थ ठिकाणीदेखील वस्ती-वाड्यांवर फुटबॉलच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.