गुवाहाटी : हादजी ड्रेम आणि जिमुसा ट्राओरे याच्या गोलच्या बळावर माली संघाने आज येथे दोन आफ्रिकन संघांदरम्यान झालेल्या लढतीत घाना संघावर २-१ अशी मात करून फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरी गाठणारा माली हा पहिला संघ ठरला.ड्रेमने १५ व्या मिनिटाला माली संघाला आघाडी मिळवून दिली होती तर ट्राओरेने ६१ व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी २-० अशी दुप्पट केली. घाना संघाकडून कुदुस मोहम्मद याने ७० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. हा सामना इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियममध्ये पावसात खेळवला गेला.उद्या स्पेन आणि इराण यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील विजयी संघाविरुद्ध माली संघ बुधवारी नवी मुंबईत सेमीफायनलमध्ये दोन हात करील. माली संघाने यावर्षी आफ्रिका नेशन कप अंडर १७ फायनलमध्येदेखील घानाला पराभूत केले होते आणि येथेदेखील या पश्चिम आफ्रिकी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखण्यात ये ते यशस्वी ठरले.>ड्रेमच्या गोलने घाना आले दबावातपावसामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी संघासाठी परिस्थिती प्रतिकूल होती. माली संघाने पूर्वार्धात वर्चस्व ठेवले आणि त्यांनी १५ व्या मिनिटाला पहिला गोल करून घाना संघावर दबाव टाकला. ड्रेम याने एकट्याने घानाच्या गोलपोस्टपर्यंत धडक मारत आणि गोलरक्षक डोनाल्ड इब्राहिम याला सहजपणे चकवताना गोल केला. हा त्याचा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला.घाना संघाने बरोबरी साधण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु यादरम्यान त्यांना नशिबाची साथ मिळालीनाही. मध्यंतराच्या काही क्षणाआधी इब्राहिम सुले याने गोल केला होता; परंतु त्याचा सहकारी कुदुस मोहंमदच्या फाउलमुळे हा गोल अमान्य करण्यात आला.माली संघाने एकतासाचा खेळ संपल्यानंतर तात्काळ ट्राओरे याच्या गोलने आपली आघाडी दुप्पट केली. त्याने घानाच्या विखुरलेल्या बचावफळीचा फायदा घेत आणि इब्राहिमला चकवत गोल केला.घानाला ७० व्या मिनिटांत स्थानापन्न सादिक इब्राहिमला मालीच्या बॉक्समध्ये पाडल्या गेल्यामुळे पेनल्टी मिळाली. त्याचे कुदुस मोहंमदने गोलमध्ये रुपांतर केले. तथापि, त्यानंतर बरोबरी साधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवर मालीच्या खेळाडूंनी पाणी फेरले आणि दुसºयांदा अंडर १७ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. माली संघाचा कर्णधार मोहम्मद कमरा याला आज दुसरे पिवळे कार्ड मिळाले. त्यामुळे तो उपांत्य फेरीत खेळू शकणार नाही.
फुटबॉल : घाना संघावर २-१ गोलने मात करत माली उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:18 PM