लंडन - इंग्लिश प्रीमियर लीगमधील आघाडीचा क्लब असलेल्या लीव्हरपूलचा तो स्टार खेळाडू. त्याची वर्षाची कमाई अब्जाबधीच्या घऱात, मनात आणले तर दिवसाला एक आयफोन खरेदी करेल एवढी बक्कळ संपत्ती. पण तरही हा खेळाडू क्रॅक स्क्रीन असलेल्या मोबाईलसह दिसून आला. सॅडियो माने असे या फुटबॉलपटूचे नाव. मात्र फुटक्या मोबाइलसह फोटो व्हायरल झाल्यापासून अब्जाबधीची कमाई असूनही सॅडियो अशाप्रकारचा मोबाईल का वापरतो, असा प्रश्न त्याच्या जगभरातील चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला गेल्यानंतर सेनेगलचा नागरिक असलेल्या सॅडियो माने याने आपल्या साध्या राहणीचे कारण स्पष्ट केले आहे. सॅडियो आपल्या मोठ्या कमाईमधून बराचसा हिस्सा आपल्या देशातील धर्मादाय संस्थांना दान देत असल्याचे त्याने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले आहे. सुखवस्तू जीवन जगण्यापेक्षा सॅडयोने आपल्या कमाईचा मोठा हिस्सा आपल्या मातृभूमीत धर्मादाय संस्थांवर खर्च करण्यास प्राधान्य का दिले, हे गुपित त्याने या मुलाखतीत मांडले आहे. तो म्हणाला, “ मला दहा फेरारी, वीस डायमंड घड्याळे किंवा दोन विमाने घेऊन मी काय करणार आहे? या वस्तू माझ्यासाठी आणि जगासाठी काय काम करतील? एकेकाळी मी भुकेला होतो. मला शेतात काम करावे लागायचे. मी खूप खडतर काळातून वाटचाल केली आहे. अनवाणी पाय फुटबॉल खेळलो आहे, माझं शिक्षण आणि इतर बर्याच गोष्टी नव्हत्या. पण आज मी जे मिळवतो ते सर्व काही फुटबॉलमुळे. त्यामुळेच मी माझ्या लोकांना मदत करू शकतो.'' ''मी अत्यंत गरीब दारिद्र्य असलेल्या लोकांसाठी शाळा, एक स्टेडियम बांधले, आम्ही कपडे, शूज, अन्न उपलब्ध करुन दिले. याव्यतिरिक्त, मी सेनेगलच्या अत्यंत गरीब भागातील सर्व लोकांना दरमहा 70 युरो देतो ज्या त्यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेस हातभार लावतात,''असेही त्यांने सांगितले.
अब्जावधीत खेळतो, तरीही हा दिग्गज खेळाडू फुटका मोबाईल वापरतो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 8:08 PM