नवी दिल्ली - अंडर-17 फुटबॉल वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल फिफाचे अध्यक्ष गियानी इनफॅनटिनो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींना भेटता न आल्याची खंतही गियानी यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. 6 ऑक्टोंबरपासून भारतात अंडर-17 फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात झाली होती. भारतातून अनेक अविस्मरणीय आठवणी घेऊन आम्ही झ्युरिचला परतलो आहोत. अंडर-17 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यासाठी कोलकातामध्ये असताना आम्ही अनेक नवीन मित्र जोडले असे इनफॅनटिनो यांनी मोदींना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
फिफा अंडर-17 वर्ल्डकपच्या आयोजनात तुमच्या सरकारने जी भूमिका बजावली त्याबद्दल मी तुमच्या सरकारने अभिनंदन करतो तसेच स्थानिक आयोजन समितीबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. नवी दिल्ली, नवीन मुंबई, गोवा, कोची, गुवहाटी आणि कोलकाता या शहरांमध्ये फुटबॉलचे सामने आयोजित केल्याबद्दल आभार मानतो. एका सुंदर, अविस्मरणीय स्पर्धेसाठी त्या सर्वांनी योगदान दिले असे गियानी यांनी पत्रात म्हटले आहे.
गियानी उदघाटन समारंभाला उपस्थित नव्हते. मोदींना भेटता न आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पण भविष्यात भारतात फुटबॉलच्या विकासाबद्दल चर्चा करण्यासाठी मोदींना भेटण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी म्हटले आहे.
युरोपियन देशांमध्ये झाला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना
या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच युरोपियन देशांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. विशेष म्हणजे इंग्लंडने या जेतेपदासह यंदाच्या वर्षी झालेल्या 17 वर्षांखालील युरो चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपाही काढला. १७ वर्षांखालील युरो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत इंग्लंडला नमवले होते. त्याचप्रमाणे, यंदाच्या वर्षी सुरुवातीला कोरियामध्ये झालेल्या २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही इंग्लंडने चषक उंचावला होते. दुसरीकडे, स्पेनला चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. याआधी स्पेनने १९९१, २००३ आणि २००७ साली उपविजेतेपद पटकावले होते. यंदा त्यांना विश्वविजेते बनण्याची संधी होती, परंतु तुफान फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडने त्यांचे स्वप्न धुळिस मिळवले. इंग्लंडच्या फॉर्मपुढे बलाढ्य आणि संभाव्य ब्राझीललाही उपांत्य फेरीतून आपला गाशा गुंडाळावा लागला होता. परंतु, त्यांनी तिसºया स्थानाच्या लढतीत झुंजार मालीचा पराभव करुन कांस्य पदक पटकावले.