ते सध्या 70 वर्षांचे आहेत... आपल्या आयुष्यातील बराच काळ त्यांनी भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्याफुटबॉलसाठी खर्ची घातला... 1971च्या फुटबॉल संघाच्या रशिया दौ-यात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले होते... भारताचा हा माजी फुटबॉलपटू आज कॅन्सरशी लढा देत आहे आणि आर्थिक सहकार्यासाठी त्यांनी मदतीची साद घातली आहे. ऑर्थर परेरा असे या माजी खेळाडूचे नाव आहे आणि मागील 18 दिवसांपासून ए.सी.परेरा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
27 डिसेंबर 1948मध्ये गोव्यातील अल्डोना येथील त्यांचा जन्म... स्थानिक मर्सेस स्पोर्ट्स क्लबने परेरा यांच्यातील फुटबॉल प्रेम हेरले. 1965 ते 67 या कालावधीत त्यांनी याच क्लबचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते मायानगरी मुंबईत आले. एक सत्र त्यांनी ब्रिटानिया बिस्किट कंपनी फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. डाव्या पायाने गोल करण्याचे कौशल्य त्या काळात क्वचितच कुणामध्ये दिसले असेल. 1970 मध्ये त्यांनी कोरेस इंडिया लिमिटेड कंपनी जॉइन केली. D क्षेत्रात गोल करण्यात तरबेज असलेल्या परेरा यांनी कोरेस संघाला जेतेपद पटकावून दिले.
त्यांनी ही यशोगाथा ओर्काय मिल्स संघाकडूनही कायम राखली. ओर्काय मिल्सला परेरा यांनी बरीच जेतेपदे जिंकून दिली. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. 1971 ते 76 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. 1971मध्येच त्यांना भारतीय संघाकडून बोलावणे आले आणि रशिया दौ-यातील भारतीय संघाचा सदस्य होण्याचा मान त्यांनी पटकावला.
त्यांचा फिटनेस कोणालाही हेवा वाटावा अशा होता. फुटबॉलपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मालाड येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये क्रीडा प्रशिक्षक, हॉकी आणि क्रिकेट संघाचे फिजिकल फिटनेस पाहण्याचे काम केले. 1998 पासून ते मागील काही वर्षांपर्यंत ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांना शाळेने पुन्हा जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्याचा मान राखत ते 12 वर्ष कार्यरत होते.
मुलांचा सराव करून घेत असताना त्यांचा उजवा खांदा अचानक दुखू लागला आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तेथून त्यांना थेट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मागील वीसेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले असून कुटुंबीयांनी सर्व जमापुंजी एकत्र करून 10 लाख रुपये जमवले आहेत आणि पुढील उपचारासाठी त्यांना आणखी मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी फ्लुएल अ ड्रिम ( FUEL A DREAM) या संस्थेने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.