पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी कतारला रवाना होण्यापूर्वी मँचेस्टर युनायटेड क्लबसोबतचे सर्व संबंध तोडून आला. रेयाल माद्रिद सोबतचा कित्येक वर्षांचा पर्वास रोनाल्डोने युव्हेंटस क्लबकडून खेळण्यासाठी सोडला आणि त्यानंतर काही वर्षांतच तो पुन्हा जुना क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये परतला. सर अॅलेक्स फर्ग्युसन यांनी सर्वात प्रथम रोनाल्डोला या क्लबमध्ये आणले होते आणि तिथेच खऱ्या अर्थानं पोर्तुगालच्या या स्टारचा प्रवास सुरू झाला. त्याच क्लबमधून त्याच्या फुटबॉल कारकीर्दिला विराम लागतो की काय, अशी शंका उपस्थित होत होती. पण, ३७ वर्षीय रोनाल्डोला मार्केटमध्ये अजूनही डिमांड आहे.
Video : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड रेकॉर्ड! पेले, मेस्सी यांच्यासह कोणालाच जमला नाही हा पराक्रम
पोर्तुगालने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात घानावर ३-२ असा विजय मिळवला आणि त्या सामन्यात रोनाल्डोने पेनल्टीवर पहिला गोल केला. ५ वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये गोल करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू बनला. मँचेस्टर युनायटेडला सोडल्यानंतर आता रोनाल्डो कोणत्या क्लबकडून खेळेल याची सर्वांना उत्सुकता होती. अनेकांनी रोनाल्डो व लिओनेल मेस्सी हे स्पर्धक आता पॅरीस सेंट जर्मेन क्लबकडून एकत्र खेळताना दिसतील असा अंदाज बांधला. पण. आता सौदी अरेबियाच्या अल-नासर ( Al-Nassr FC ) फुटबॉल क्लबने रोनाल्डोला तगडी ऑफर दिल्याची चर्चा सुरू आहे.
सौदी अरेबियातील या क्लबने रोनाल्डोला वर्षाला ६२ मिलियन पाऊंड देण्याची ऑफर दिली आहे आणि तीन वर्षांचा हा करार असणार आहे. म्हणजेच रोनाल्डोला १८६ मिलियन पाऊंड देण्याची तयारी या क्लबने दाखवल्याचे वृत्त The Sun ने दिले आहे. भारतीय रक्कमेत सांगायचे झाले तर रोनाल्डोला तीन वर्षांसाठी १८३६ कोटी ६९ लाख ५२,२०५ रुपये देण्याची तयारी अरेबियन क्लबची आहे. त्यामुळे ४०व्या वर्षापर्यंत रोनाल्डोला खेळताना पाहण्याची संधी त्याच्या फॉलोअर्सना मिळणार आहे. रोनाल्डोची आठवड्याची कमाई ही ११ कोटी, ८४ लाख ९६, ४६५ इतकी असणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"