- रणजीत दळवीफ्रान्सचे विजेतेपद अपेक्षित होते. पण क्रोएशियाने ते त्यांना सहजासहजी दान नाही केले! ४-२ ही गुणसंख्या सामन्यातल्या तीव्रतेचे निदर्शक निश्चितच नाही. एका नव्या पिढीचा उदय पाहावयास मिळाला, तर दुसरीकडे जेष्ठांची पिढी अस्ताला जाताना दिसत आहे. ती पुढच्या वेळी विश्वस्तरावर पाहावयास मिळणे कठीण वाटते. आता अधिक चर्चा होऊ लागेल कायलियन एमबाप्पे, पॉल पोग्बा, अँतोइनी ग्रीझमन यांची. त्यामानाने लुका मॉडरिच, इव्हान पेरिसिच किंवा मारिओ मँडझुकिच यांच्याविषयी फारसे कानी पडणार नाही.क्रोएशियाच्या अनपेक्षित आक्रमक सुरुवातीमुळे फ्रान्सची बचाव करताना त्रेधातिरपीट उडाली. सॅम्युअल उम्टीटीने पेरिसिचला दोनदा रोखले नसते, तर निकाल वेगळा लागला असता. पण १७व्या मिनिटाला ग्रीझमन खाली पडला आणि अर्जेंटिन रेफ्री नेस्टर पिटाना यांनी फ्री किक देण्यास भाग पाडले. ग्रीझमनने डाव्या पायाने चेंडू इनस्विंग केला पण मँडझुकीचच्या डोक्याला लागून स्वयंगोल झाला. हा क्रोएशियासाठी फार मोठा धक्का होता. यानंतर आक्रमणे - प्रतिआक्रमणे खेळात रंग भरत असता फ्रान्सला पेनल्टी मिळाली. ग्रीझमनने घेतलेल्या कॉर्नरवर ब्लेझ मॅटुइडीने हेडर मारला, तेव्हा पेरिसिचनेही त्याच्यासोबत हवेत झेप घेतली. मात्र गोलजाळ्याच्या दिशेने जाणारा चेंडू त्याच्या हाताला लागला व रेफ्रींनी पुन्हा कॉर्नरचा इशारा दिला.यावर फ्रान्सच्या खेळाडूंनी अपील केली आणि रेफ्री पिटाना यांना ‘व्हीएआर’कडून चेंडू हाताला लागल्याचा दुजोरा मिळाला. यानंतर त्यांनी फ्रान्सला पेनल्टी दिली आणि ही संधी ग्रीझमनने घालवली नाही. त्याने थंड डोक्याने किक मारताना सुबासिचला पूर्णपणे चकविले. फुटबॉलच्या कायद्यानुसार, खेळाडूला आपला चेहरा किंवा शरीराच्या अन्य कोणत्याही भागाचे हातांचा वापर करून रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अगदी चेंडू गोलमध्ये जात असला तरीही! मात्र पेरिसिच काय येथे स्वत:चे रक्षण करत होता?क्रोएशियाने यानंतरही आक्रमणे कायम ठेवली, पण त्यांना यश आले नाही. मध्यंतराच्या ठोक्यावर पेरिसिचने वायलोकच्या छान क्रॉसवर कोणताच प्रयत्न केला नाही, हे जरा आश्चर्यकारक वाटले. स्पर्धेत तीन सामने लांबल्याने क्रोएशियन थकण्याची शक्यता खरी ठरली. यामुळे फ्रान्सला वरचष्मा प्रस्थापित करण्यात यश आले. एनगोलो काँटे नेहमीप्रमाणे खेळत नसल्याने एनझोन्झीला त्याच्या जागी मैदानात आणल्याने फ्रान्सची मधली फळी स्थिर झाली. एमबाप्पेने एकदा व्हिडाला मागे टाकल्यानंतर सुबासिचने त्याचे आक्रमण उधळले. पण अशीच एक वेगवान धाव घेत एमबाप्पेने तिसऱ्या गोलला मोलाचा हातभार लावला. पोग्बाने त्याला चाळीस यार्डाचा पास दिल्यानंतर स्वत: त्याच्या बॅकअपसाठी पेनल्टी क्षेत्रात पोहोचला. या वेळी पोग्बाचा पहिला फटका अडविल्यानंतरही पुन्हा पायात आलेल्या चेंडूला पोग्बाने अचूकपणे गोलजाळ्यात ढकलले.अंतिम क्षणात ल्युकास हर्नांडेझने डावीकडून जबरदस्त आक्रमण करत एमबाप्पेला पास दिला. गती आणि दिशा अचूक असल्याने सुबासिच पुन्हा निरुत्तर झाला. यानंतर मँडझुकिचने एललॉरिसच्या ढिलाईचा फायदा घेत एक गोल करत आपल्या चुकीचे काही अंशी निराकरण केले इतकेच!>चक्क पावसात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंडा ग्रॅबर - किटरोव्हिच यांनी मोठ्या खिलाडूवृत्तीने सहभागी होत कर्तव्य पूर्ण केले! प्रसिद्धीसाठी भुकेलेल्या आमच्या पुढाºयांनी यातून बोध घ्यावा!
फ्रान्सने योग्यता सिद्ध केली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:44 PM