फ्रान्सने 1998 नंतर पुन्हा जेतेपद पटकावले.... बीस साल बाद फ्रान्स जगज्जेता झाला... खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक उंचावणारे दिडीयर डेश्चँम्प्स हे तिसरे व्यक्ती ठरले.... एकापेक्षा अधिक विश्वचषक उंचावणा-या सहा संघांमध्ये फ्रान्सने एन्ट्री केली... यासारखे अनेक विक्रम मॉस्कोतील लुझनिकी स्टेडियमवर रविवारी नोंदवले गेले. अंतिम फेरीत खेळण्याचे दडपण कसे हाताळायचे याचा अनुभव फ्रान्सने 2016च्या युरो स्पर्धेत घेतला होता. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांचे पारडे जड होतेच, परंतु क्रोएशियाच्या मजबूत निर्धारासमोर त्यांचा निभाव लागणे अवघड वाटत होते. त्यामुळे या लढतीचे प्रेडीक्शन करणे बड्या बड्या एक्स्पर्ट्सना अवघड जात होते. अंतिम फेरीत दोन्ही संघ फॉरमेशनमध्ये प्रयोग करतील याची चुणूक लागलीच होती. पण, म्हणून दोन्ही संघ 4-2-3-1 या फॉरमेशननेच खेळतील याची अपेक्षा कोणी केली नव्हती. चार डिफेंडर, दोन सेंटर मिडफिल्डर, तीन मिडफिल्डर आणि एक स्ट्रायकर ही रणनिती दोन्ही संघांनी आखली होती. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल यात शंका नव्हती. पण, क्रोएशियाने पहिल्या सत्रात आत्मघातकी खेळ केला. त्यांनी फ्रान्सला फुकटचे दोन गोल दिले आणि या दोन्ही चूका क्रोएशियाचा नायक मँडझुकीचकडून झाल्या. पहिलीच मेगा फायनल खेळणा-या क्रोएशियावर प्रचंड दडपण जाणवत होते. त्यात फ्रान्सचे डिफेंडर पव्हार्ड, व्हॅरने, उमटीटी आणि हर्नांडेझ यांनी आपली कामगिरी चोख बजावली. त्यांनी केवळ क्रोएशियाचे आक्रमण थोपवलेच नाही, तर क्रोएशियाच्या गोल करण्याच्या अनेक प्रयत्न निष्प्रभ ठरवले. क्रोएशियाच्या लव्हरेन, व्हिडा आणि स्ट्रीनीच यांना ते जमले नाही. पोग्बा आणि मेबाप्पे यांनी सोप्या संधीवर सहज गोल केले. आकडेवारीत क्रोएशिया आघाडीवर असूनही फ्रान्सचा मजबूत डिफेन्स भेदण्यात ते अपयशी ठरले. 2016 च्या युरो स्पर्धेत 120 मिनिटांच्या खेळात घरच्या प्रेक्षकांसमोर फ्रान्सला पराभव पत्करावा लागला होता. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी न करणा-या पोर्तुगालकडून त्यांना 1-0 असा पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यानंतर फ्रान्सने आपल्या खेळाचा स्तर प्रचंड उंचावलेला पाहायला मिळाला. दोन वर्षांपूर्वीच्या त्या पराभवाची सर्व कसर त्यांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भरून काढली. सर्वोत्तम सांघिक कामगिरी करताना फ्रान्सने जेतेपदाचा ताज आपल्या शिरपेचात खोवला. पोर्तुगालकडून झालेल्या त्या पराभवाची सल आज फ्रान्सने भरून काढली. त्यांनी 4-2 अशा फरकाने क्रोएशियाला नमवून विश्वविजेतेपद पटकावले.