स्वदेश घाणेकर : शेवटी जे घडायला नको होते तेच झाले. मेसूट ओझिलच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्याने मौन सोडले. तसे करताना तो इतक्या टोकाची भूमिका घेईल याचा अंदाजही कुणी बांधला नव्हता. मनातली खदखद व्यक्त करताना त्याने थेट राष्ट्रीय संघाची जर्सी खुंटीला टांगली, ती कायमचीच. यापुढे जर्मनीकडून न खेळण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. कोणी त्याच्या बाजूने होते, तर कोणी विरोधात. पण या विरोधाची इतकी सवय झालीय की त्याचा विचार करण्याचे त्याने केव्हाच सोडून दिले आहे.
मे महिन्यातील तो दिवस होता. टर्किचे अध्यक्ष रिसेप टॅयीप इर्डोगन काही कामानिमित्त लंडनमध्ये आले होते. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये आर्सेनल क्लबचे प्रतिनिधीत्व करणारा ओझिल लीगसाठी तेथेच होता. त्यावेळी इर्डोगन यांनी ओझिलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. टर्कीच्या अध्यक्षांचा मान राखायचा म्हणून ओझिलनेही होकार दिला आणि ठरल्याप्रमाणे ही भेट झाली. आपण कोठून आलो आहोत, याची नेहमी जाण ठेव आणि तेथील प्रत्येक व्यक्तीचा आदर कर, ही शिकवण ओझिलला लहानपणी आईकडून मिळाली होती. त्याने त्याचे पालन केले, त्यात त्याचे काय चुकले.
इर्डोगन यांना भेटण्यासाठी तो एकटा गेला नव्हता, त्याच्यासह जर्मन संघातील सहकारी इकाय गुंडोजॅन हाही होता. ओझिल आणि गुंडोजॅन दोघेही टर्कीश-जर्मन. ओझिलची आई टर्कीची, तर वडील जर्मनीचे. इर्डोगन यांनी ओझिल गुडोजॅन यांच्यासह असलेल्या फोटोचा राजकीय वापर केला आणि निवडणूक जिंकली. त्यानंतर जर्मनीच्या मीडियाने ओझिल व गुंडोजॅन यांना धारेवर धरले. त्यावर गुंडोजॅनने स्पष्टीकरण दिले, परंतु ओझिलने तसे करण्याची गरज समजली नाही.
इथून वाद अजून चिघळला. मीडियाने त्याच्यावर वांशिक शेरेबाजी केली. सोशल मीडियावर नेटीझन्सनेही ओझिलला टार्गेट केले. विश्वचषक स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित करताना त्याने या टीकांवर मौन धरणेच पसंत केले. पण, सोमवारी हे मौन सुटले. टीका करणा-यांपेक्षा या संपूर्ण प्रकरणावर जर्मन फुटबॉल फेडरेशनकडून कोणतीच प्रतिक्रीया आली नाही, याचे त्याला अधिक दुःख वाटले. त्याचा परिणाम कामगिरीवरही झाला. जर्मनीच्या गोल्डन जनरेशनमधील प्रमुख खेळाडू असलेला ओझिल आता जर्मन चाहत्यांना नकोसा झाला.
2009 मध्ये 21 वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद विजेत्या संघातील सदस्य असलेल्या ओझिलने मॅन्युयल न्युयर, जेरोम बोएटेंग, मॅट्स ह्युमेल्स, सॅमी खेदीरा, बेनेडीक्ट हाऊडेस यांच्यासह वरिष्ठ संघात स्थान पटकावले. 2014 च्या विश्वचषक विजयात ओझिलचाही सिंहाचा वाटा होता. पण, रशियात तो अपयशी ठरल्यानंतर पुन्हा त्याचा वांशिक वाद उकरून काढायचा आणि त्यामुळे तो चांगला खेळला नाही असे म्हणायचे, हा उद्योग तेथील मीडियाने सुरू केला. त्यांनी सर्व सीमा ओलांडल्यानंतर ओझिलने जर्मनीकडून न खेळण्याचा निर्णय घेतला.
खेळाडू हा त्याच्या मैदानावरील कामगिरीने ओळखला जावा. जात, रंग, रूप हे सर्व त्याच्या कामगिरीसमोर शुल्लक असायला हवेत. पण याचा विसर जर्मन मीडियाला पडलेला दिसला. ओझिलवर टीका करताना त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यामुळे ओझिलला अखेर जर्मन हे वागण बरे नव्हे असे बोलावे लागले.