नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देशातर्फे १०० सामने खेळण्याचा पराक्रम करणारा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची प्रशंसा केली.माजी कर्णधार बाईचुंग भूतियानंतर १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा छेत्री भारताचा एकमेव फुटबॉलपटू आहे. सोमवारी रात्री इंटर कॉन्टिनेंटल कपमध्ये केनिया विरुद्धच्या लढतीत त्याने हा पराक्रम केला. आॅगस्ट महिन्यात ३४ वर्षांचा होणाऱ्या छेत्रीने केनिया विरुद्धच्या लढतीत दोन गोल नोंदवले. या सामन्यात भारताने ३-० ने विजय मिळवला. राठोड यांनी टिष्ट्वट केले,‘आमच्या फुटबॉल संघाचा शानदार व चांगला विजय. संघाने केनियाविरुद्ध मिळविलेल्या विजयासाठी अभिनंदन. सुनील छेत्रीने संघाचे नेतृत्व करताना आपल्या १०० व्या सामन्यात दोन गोल केले.’तेंडुलकरने म्हटले की,‘विशेष विजय. खूप शानदार कामगिरी टीम इंडिया. सुनील छेत्रीचे शानदार यश. १०० वा सामना आणि दोन गोल.’माजी कर्णधार भूतियाने लिहिले की,‘भारतातर्फे १०० वा सामना खेळण्यासाठी सुनील छेत्रीचे अभिनंदन. या टप्प्यावर तुला बघून आनंद झाला. एका जिनियस खेळाडूची महान कमागिरी.’ (वृत्तसंस्था)मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेन्टाईन म्हणाले, ‘छेत्री भारतीय फुटबॉलचा महान सेवक आहे.’ माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण व वीरेंद्र सेहवाग यांनीही छेत्रीचे अभिनंदन केले.लक्ष्मणने लिहिले की,‘विजयासाठी भारताचे अभिनंदन. कर्णधार सुनील छेत्रीचे विशेष अभिनंदन. त्याने १०० व्या लढतीत दोन गोल नोंदवले.’ सेहवागने टिष्ट्वट केले,‘शानदार विजय. अभिनंदन सुनील छेत्री, आपल्या १०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल नोंदवण्यासाठी आणि गर्दीने फुललेल्या स्टेडियममध्ये दोन गोल करण्यासाठी. भारतीय फुटबॉलसाठी चांगले वृत्त.’
दिग्गजांनी केली छेत्रीची प्रशंसा;राज्यवर्धनसिंग राठोड, सचिन तेंडुलकर यांनीही केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:31 PM