मुंबई- फुटबॉलचे सामने बघताना प्रत्येक सेकंदाला थराराचा अनुभव प्रेक्षकांना मिळत असतो. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत असे करोडो चाहते फुटबॉल या खेळाचे आहेत. विशेष म्हणजे फुलबॉलच्या मैदानावर बऱ्याच गोष्टीही पाहायला मिळतात. अशीच एक घटना नुकतीच फुटबॉल मैदानावर पाहायला मिळाली. ट्यूनीशिया संघातील खेळाडूचं एक नाटक सध्या चर्चेचा विषय आहे. ट्यूनीशियाचे अनेक खेळाडू मुस्लीम आहेत. सध्या रमझानचा पवित्र महिना सुरु असून अनेकांचा रोजा सुरु आहे. सामना सुरु असताना आपल्या मुस्लीम सहकारी खेळाडूंना रोजा सोडता यावा यासाठी गोलकीपरने चक्क जखमी झाल्याचं नाटक केलं. फिफा वर्ल्ड कपआधी हा फ्रेंडली सामना खेळवला जात होता त्यावेळी ट्यूनीशीया संघाचा खेळाडून मोऊन हसन मैदानावर जखमी झाल्याचं नाटक करत झोपी गेला.
झालं असं की, ट्यूनीशिया व पोर्तुगलमधील सामना सुरु असल्याने खेळाडूंना रोजा सोडणं शक्य नव्हतं. म्हणून मग रोजा सोडण्याची वेळ होताच गोलकीपर मोऊन हसन जखमी झाल्याचं नाटक करत मैदानावरच झोपी गेला. पंचांनीही गोलकीपर जखमी झाल्याचं समजत सामना काही वेळासाठी थांबवला. जोपर्यंत मेडिकल टीमकडून तपास सुरू असतो तो पर्यंत खेळाडूंना ब्रेक मिळतो. सहकारी खेळाडूंनी लगेचच या ब्रेकचा फायदा घेत ज्यूस पिऊन आणि खजूर खाऊन आपला रोजा सोडला, पहिला सामना पोर्तुगलविरोधात होता. यावेळी जेव्हा सामना २-१ वर होता तेव्हाच ५८ व्या मिनिटाला गोलकीपरने जखमी होण्याचं नाटक केलं होतं. हा सामना २-२ वर ड्रॉ झाला होता.