पणजी : गोलरक्षक रिकार्डाे मोंटेनेग्रो याच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर कोस्टारिकाने गिनी संघाला २-२ अशा बरोबरीवर रोखले. या निकालानंतर १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ‘क’ गटात कोस्टारिकाने तिसरे स्थान गाठले. अनिर्णीत निकालामुळे उभय संघांची बाद फेरीत पोहोचण्याची आशा कायम आहे. हा सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला.सामन्यात कोस्टारिकाने दोन संधींवर आघाडी मिळवली. दुसरीकडून गिनीने प्रत्येक वेळी पुनरागमन केले. कोस्टारिकाला येक्सी जारक्विनने २६ व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, सामन्यावर गिनीचा दबदबा होता. मोंटेनेग्रो याने त्यांच्या बºयाच प्रयत्नांना अपयशी ठरवले. अखेर ३० व्या मिनिटाला फोंडजे टूर याने बरोबरी साधून दिली.मध्यंतरानंतर कोस्टारिकाने पुन्हा आघाडी मिळवली. गिनीच्या कमकुवत बचावाचा फायदा उठवत आंद्रे गोमेज याने ६७ व्या मिनिटाला गोल नोंदवला. आफ्रिकन संघाने वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला.८१ व्या मिनिटाला इब्राहिम सोमाह याने शानदार गोल नोंदवून कोस्टारिकाला धक्का दिला. त्यानंतर गिनी संघाने निर्णायक गोलसाठी खूप धडपड केली. मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. कोस्टारिकाच्या उत्कृष्ट गोलरक्षणामुळे गिनीला गोल नोंदवता आले नाहीत. आता कोस्टारिकाचा पुढील सामना इराणविरुद्ध १३ आॅक्टोबर रोजी कोची येथे होईल. या दोन्ही संघांचा प्रत्येकी दोन सामन्यांतून प्रत्येकी एक गुण आहे.
अखेर गिनीची बरोबरी! रिकार्डाे मोंटेनेग्रोचा शानदार खेळ; कोस्टारिकाला रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:27 AM