त्रिवेंद्रम : फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर भारतात अनेक राज्यात पसरला असून केरळ तर फुटबॉलमय झाले. राज्याची राजधानी असलेल्या त्रिवेंद्रमचा एक चाहता केरळहून चक्क सायकलने रशियात दाखल झाला आहे.विश्वचषकाचे सामने प्रत्यक्षात पाहता यावे आणि आपला आवडता खेळाडू मेस्सीला भेटता यावे, अशी त्याची इच्छा आहे. २८ वर्षांचा क्लिफिन फ्रान्सिस २३ फेब्रुवारी रोजी दुबईमार्गे रशियाकडे गेला. दुबईत त्याने सायकल खरेदी केली. त्यानंतर तो इराणच्या द. पूर्वेला असलेल्या अब्बास शहरातील बंदरात दाखल झाला. तेथून पुन्हा सायकल प्रवास सुरू केला.रशियातील तामबोव येथे दाखल झाल्यानंतर चार महिन्यात येथे पोहोचल्याचे त्याने सांगितले. २६ जून रोजी फ्रान्स- डेन्मार्क यांच्यात होणाऱ्या सामन्याचे तिकीट फ्रान्सिसने खरेदी केले आहे. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजीनियर असलेला फ्रान्सिस म्हणाला, ‘माझ्या सायकल प्रवासात चांगले तसेच वाईट अनुभवही आले. प्रत्येक दिवशी नवे लोक भेटतात, शिवाय नवे जग पहायला मिळते. नव्या संस्कृतीचा परिचय घडतो. व्हिसा असल्यानंतरही मला अझरबैजान येथून जॉर्जियाला जाण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे रस्ता बदलावा लागला.’ त्याचप्रमाणे, ‘जर्मनीच्या सायकलस्वारांना जाण्याची परवानगी मिळाल्याने माझ्याबाबत असे झाल्याने मी व्यथित झालो होतो. दुसरीकडे काही लोकांनी त्यांच्या घरी राहू दिले. मी फुटबॉलप्रेमी असल्याने विश्वचषकाचे सामने प्रत्यक्षात पाहणे आपले स्वप्न होते,’ असेही फ्रान्सिसने म्हटले. बी. टेक. असलेला फ्रान्सिस गणिताचा प्राध्यापक आहे. या प्रवासात फ्रान्सिसने स्वत:चा वाढदिवस इराणच्या मेमेह शहरामध्ये स्थानिक नागरिकांसह साजरा केला. २१ जूनला तो मॉस्कोत दाखल होणार असून मेस्सीला भेटण्याचे स्वप्न साकार होईल, अशी त्याला आशा आहे.>मेस्सीची भेट घेण्याची माझी मनापासून इच्छा आहे. हे शक्य होईल का, याबद्दल सांगू शकत नाही, मी मेस्सीचा मोठा चाहता आहे. माझी मेहनत सफल होईल, असे मनोमन वाटते.-क्लिफिन फ्रान्सिस
...त्याने सायकलने गाठली रशिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 3:56 AM