नवी दिल्ली - आपला आवडता फिल्मस्टार, खेळाडू यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते वाटेल ते करण्यास तयार असतात. सध्या रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने अशाच एका चाहत्याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. फुटबॉलवेड्या केरळमधील क्लिफिन फ्रान्सिस या तरुणाने फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला भेटण्यासाठी चक्क सायकलवरून रशिया गाठले आहे. मेस्सीचा चाहता असलेल्या क्लिफिनला आपल्या सायकलवर मेस्सीची स्वाक्षरी हवी आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. साकलवरून रशिया गाठणारा क्लिफिन म्हणतो की, मी लहानपणापासूनच फुटबॉलचा चाहता आहे. बार्सिलोना हा माझा आवडता संघ आहे. तसेच फुटबॉल विश्वचषक पाहणे हे माझे स्वप्न आहे. पण हे स्वप्न पूर्ण करणे माझ्यासाठी बरेच खर्चिक ठरत आहे."क्लिफिन याला फ्रान्स आणि डेन्मार्कमध्ये होणारी साखळी लढत पाहायची आहे. त्यानंतर तो काही दिवस रशियात वास्तव्य करणार आहे. त्यानंतर मेस्सीची स्वाक्षरी असलेली सायकल घेऊन तो भारतात परत येईल. उच्चशिक्षित असलेल्या क्लिफेनने बीटेकची पदवी घेतल्यानंतर कोची येथे सिस्टिम इंजिनियर म्हणून नोकरी केली होती. तसेच आपल्या रशिया दौऱ्यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी शिकवण्याही घेतल्या. क्लिफिन याने आपल्या रशिया प्रवासाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात केली. "सुरुवातीला मी केरळमधून दुबईला गेलो. तिथे मी सायकल विकत घेतली. त्यानंतर थेट रशियाची वाट धरली. यूएई, इराण, अझरबैजान असा प्रवास करत रशिया गाठले. मी अद्यापही मॉस्कोपासून 600 किमी दूर आहे. मी भारतीय असल्याचे ज्यांना ज्यांना समजते ते माझ्याशी चांगले वर्तन करतात, असेही क्लिफन याने सांगितले.
जबरा फॅन! मेस्सीला भेटण्यासाठी त्याने सायकलवरून गाठले रशिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 8:55 AM