दोहा : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या इंग्लंड-इराण या दुसऱ्या लढतीत अनोखा प्रकार घडला. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबसक्तीविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेळाडूंनी सामन्याआधी राष्ट्रगीत न गाता सरकारचा विरोध केला. हिजाब परिधान न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली होती. तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता. नंतर देशात विरोध सुरू झाला. सप्टेंबरमध्ये सेनेगलविरुद्ध सामन्यात देशातील महिलांना पाठिंबा देताना इराणच्या फुटबॉलपटूंनी राष्ट्रगीतदरम्यान आपल्या संघाचे चिन्ह न दिसण्यासाठी काळे जॅकेट परिधान केले होते.
राष्ट्रगीत न गाण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला होता. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर कोणत्याही खेळाडूच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसले नाहीत. - अलिर्जा जहानबख्श, कर्णधार - इराण
हिजाब काढल्याने अभिनेत्रींना अटकतेहरान - इराणमध्ये मागील दोन महिन्यांपासून हिजाबसक्तीविरोधात तीव्र आंदोलन करीत आहेत. त्यांच्या समर्थनासाठी हेंगामेह गजियानी आणि कातायुन रियाही या दोन प्रख्यात अभिनेत्रींनी हिजाब उतरवून फोटो सोशल मीडियामध्ये शेअर केले. सरकारच्या आदेशाविरोधात कृती केल्याच्या आरोपावरून दोघींना अटक करण्यात आली आहे. हेंगामेह गजियानी यांनी फोटोसोबत म्हटले होते, बहुतेक माझा हा अखेरचा व्हिडीओ असेल. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की काहीही झाले तरी या क्षणापासून अखेरच्या श्वासापर्यंत मी इराणच्या जनतेसोबत आहे.