कोलकाता : १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा युवा विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर ब्राझीलच्या खेळाडूंनी यासाठी खराब फिनिशिंगला जबाबदार धरले. उपांत्य फेरीत ब्राझीलला बलाढ्य इंग्लंडविरुद्ध १-३ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता.सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना दणदणीत विजयासह दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. याच स्टेडियमवर २८ आॅक्टोबरला त्यांचा सामना बलाढ्य स्पेनविरुद्ध होईल. तीन वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलने याआधी २००३ मध्ये बाजी मारली होती. परंतु, यानंतर विश्वचषक उंचावण्यात त्यांना सातत्याने अपयश आले. २००५ साली त्यांना उपविजेतेपदावर, तर २०११ साली त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर, ‘गोल करताना फिनिशिंग टच देण्यात आम्ही अपयशी ठरलो, त्यामुळे पराभव पत्करावा लागला,’ असे मत स्ट्रायकर पालिन्हो आणि मिडफिल्डर अॅलेन सौजा यांनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
खराब फिनिशिंगमुळे हरलो, ब्राझीलच्या खेळाडूंनी दिली प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:59 AM