नवी दिल्ली : भारताने फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने गमावले असले तरी मुख्य प्रशिक्षक लुई नॉर्टन डि मातोस यांनी मात्र त्यांना संघाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. भविष्यात त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.भारताला साखळी फेरीत अमेरिकेविरुद्ध ०-३, कोलंबियाविरुद्ध १-२ आणि गुरुवारी रात्री घानाविरुद्ध ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला. भारताने तीन सामन्यात ९ गोल स्वीकारले तर केवळ एक गोल केला.मातोस मात्र खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी दिसले आणि केवळ घानाविरुद्धच्या पराभवानंतर तीन सामन्यांत ९ गोल स्वीकारणे चांगला निकाल होता का, या प्रश्नावर थोडे चिडलेले दिसले.मातोस म्हणाले, ‘भारताचा सिनिअर संघ या देशांच्या सिनिअर संघांविरुद्ध कशी कामगिरी करतो, हे मला बघायचे आहे. जर हे भूतान, नेपाळ किंवा मालदीव संघ असते तर निकाल वेगळा असता. मला माझ्या संघाचा अभिमान आहे. भविष्यात त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’आय लीगमध्ये कुठल्या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास आवडेल का, याबाबत बोलताना मातोस म्हणाले,‘मी भविष्यातही या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्यास इच्छुक आहे, पण त्यासाठी मला एआयएफएफसोबत चर्चा करावी लागेल.’घानाविरुद्धच्या लढतीनंतर मातोस यांनी भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेत कमकुवत भासला. पहिल्या हाफमध्ये आमचे खेळाडू थकलेले दिसले, अशी कबुली दिली.
मला संघाचा अभिमान आहे : लुई मातोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:25 AM