बंगळुरू : चुरशीच्या झालेल्या सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पेनल्टी शूटआउटमध्ये बलाढ्य कुवेतचा ५-४ असा पराभव केला. या थरारक विजयासह भारताने विक्रमी नवव्यांदा सॅफ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ सादर करत सामना थरारक केला. उपांत्य सामन्यातही पेनल्टी शूटआउटमध्येच बाजी मारताना भारताने लेबनॉनला ४-२ असे नमवले होते.
श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही बरोबरी कायम राहिली. अखेर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. यामध्ये भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगची भूमिका निर्णायक ठरली. पेनल्टी शूटआउटमध्येही दोन्ही संघांच्या पाच प्रयत्नानंतर ४-४ अशी बरोबरी झाल्यानंतर सहाव्या प्रयत्नावर महेश सिंगने गोल करत भारताला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर कुवेतच्या खालीद इब्राहिमच्या किकचा अचूक अंदाज घेत गुरप्रीतने चेंडू यशस्वीपणे रोखला आणि भारताचे विक्रमी जेतेपद निश्चित झाले.
त्याआधी, कुवेतकडून शाबैब अलखलदी याने, तर भारताकडून लालियानजाला छांगटे याने गोल केला. १४व्या मिनिटाला अलखलदी याने अप्रतिम गोल करत कुवेतला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर दोन मिनिटांनी भारतीयांनी कुवेतच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली; पण त्यांना गोल करण्यात थोडक्यात अपयश आले. ३८व्या मिनिटाला आशिक कुरुनियनच्या पासवर सुनील छेत्रीने गोलजाळ्याच्या दिशेने कूच करत समदकडे चेंडू पास केला. समदने कोणतीही चूक न करता चेंडू छांगटेकडे सोपविला आणि त्याने शानदार गोल केला.
छेत्रीने जोडले हात
८२व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी खेळाडूला खाली पाडल्यामुळे निखिल पुजारीला रेफ्रींनी ताकीद दिली. यावेळी अनुभवी खेळाडू संदेश झिंगन याने पुजारीला पाठिंबा दिला खरा. मात्र, कर्णधार सुनील छेत्रीने या दोघांपुढे हात जोडत ‘नो फाइट मोअर’ अशी विनंती केली. दोन्ही संघांकडून या सामन्यात धसमुसळा खेळ पाहण्यात आला. या सामन्यात रेफ्रींनी एकूण ११ पिवळे कार्ड दाखवले. यापैकी ८ पिवळी कार्ड कुवेतला, तर भारताला ३ पिवळे कार्ड मिळाले.
पेनल्टी शूटआउट थरार
भारताकडून पहिली किक : सुनील छेत्रीने गोल केला. (भारत १-० कुवेत)कुवेतकडून पहिली किक : मोहम्मद दहामची किक गोलजाळ्याबाहेर. (भारत १-० कुवेत)भारताकडून दुसरी किक : संदेश झिंगनने गोल केला (भारत २-० कुवेत)कुवेतकडून दुसरी किक : फवाद अल ओतैबीने गोल केला. (भारत २-१ कुवेत)भारताकडून तिसरी किक : छांगटेने गोल केला. (भारत ३-१ कुवेत)कुवेतकडून तिसरी किक : अहमद अल धेफिरीने गोल केला. (भारत ३-२ कुवेत)भारताकडून चौथी किक : उदांता सिंगची किक गोलजाळ्यावरून गेली. (भारत ३-२ कुवेत)कुवेतकडून चौथी किक : अब्दुल अझिझ नाजीने गोल केला. (भारत ३-३ कुवेत)भारताकडून पाचवी किक : सुभाशिष घोषने गोल केला. (भारत ४-३ कुवेत)कुवेतकडून पाचवी किक : शाबैब अलखलदीने गोल केला. (भारत ४-४ कुवेत)भारताकडून सहावी किक : महेश सिंगने गोल केला. (भारत ५-४ कुवेत)कुवेतकडून सहावी किक : गोलरक्षक गुरप्रीत सिंगने खालीद इब्राहिमची किक रोखली. (भारत ५-४)