नवी दिल्ली : भारतीय संघाने रविवारी काठमांडू येथे १५ वर्षांखालील सॅफ फुटबॉल स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा २-१ गोलने पराभव करताना चॅम्पियनचा बहुमान मिळवला.या भारतीय संघात भारतीय क्रीडा महासंघाच्या विभागीय अॅकॅडमीतील खेळाडूंचा समावेश आहे. या संघाने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघ मध्यंतरापर्यंत एका गोलने पिछाडीवर होता; परंतु उत्तरार्धात लालरोकिमा याने ५८ व्या मिनिटाला आणि कर्णधार विक्रमने ७४ व्या मिनिटाला गोल करीत संघाला विजेतेपद पटकावून दिले. या यशाबद्दल एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महासचिव कुशाल दास यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.
दास म्हणाले, ‘एआयएफएफ अकॅडमीच्या मुलांनी आपल्या शानदार कामगिरीने अनेकांची मने जिंकली आहेत. अॅकॅडमी कार्यक्रमचे चांगले परिणाम आता दिसत आहेत आणि ही मुले भविष्यातही देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा मला विश्वास आहे.’सर्वच खेळाडू आणि स्टाफचे अभिनंदन. ज्याप्रमाणे मुलांनी खेळ दाखविला आहे त्यावरून युवा विकास कार्यक्रम त्यांच्या खेळात प्रगती आणत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. - प्रफुल्ल पटेल