दुबई : भारतीय फुटबॉल संघ २०१९ च्या आशिया कप बाद फेरीत पोहचू शकतो, असे मत भारतीय फुटबॉल संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले. भारताला काल येथे झालेल्या एएफसी आशिया कपच्या ड्रॉमध्ये संयुक्त अरब अमिरात, थायलंड आणि बहारीन सोबत ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे व्यवस्थापक शान्मुगम वेंकटेश यांच्यासोबत ड्रॉमध्ये सहभागी झालेले कॉन्स्टेन्टाईन यांनी सांगितले की,‘हा असा ग्रुप आहे ज्यात आम्ही बाद फेरीसाठी पात्र ठरू शकतो. मी हे म्हणणार नाही की हा सोपा ग्रुप आहे. मात्र जर आमचा दिवस चांगला राहिला तर आम्ही या संघावर विजय मिळवण्याची क्षमता बाळगतो.’
ते पुढे म्हणाले की,‘यातील प्रत्येक संघ आमच्या पुढे वेगवेगळे आव्हान ठेऊ शकतो. आम्हाला एएफसी आशिया कप दुबई २०१९ मध्ये त्यांचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे.’ भारतीय संघाने गेल्या वेळी २०११ मध्ये या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि बहरीन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने सांगितले की, आशिया कप आमच्यासाठी मोठी संधी आहे. आणि आम्ही त्यात खेळण्याची वाट पाहत आहोत. भारतामध्ये सर्वजण यासाठी रोमांचित आहेत. आम्ही सर्वोत्तम खेळ करू