मुंबई : तिरंगी १७ वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला मंगळवारी थायलंडविरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात विजय मिळवून यजमान संघ अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यातील विजेता संघ १९ डिसेंबरला स्वीडनविरुद्ध जेतेपदासाठी भिडेल.
स्पर्धेच्या सलामीलाच भारताला स्वीडनविरुद्ध ०-३ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. यानंतर स्वीडनने थायलंडला ३-१ असे नमवून दिमाखात अंतिम फेरी गाठली. त्यामुळे आता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. त्याचवेळी, थायलंडला अंतिम फेरी गाठण्यासाठी केवळ बरोबरीही पुरेशी आहे.
‘आम्ही आव्हानासाठी सज्ज असून मुलींकडे सामना जिंकण्याची चांगली संधी आहे,’ असे सांगताना भारताचे प्रशिक्षक थॉमस डेनेर्बी यांनी सांगितले की, ‘शिबिरामध्ये खेळाडूंची मानसिकता सकारात्मक आहे. आमच्यासाठी मंगळवारी नवी स्थिती असेल. अंतिम सामना खेळण्यासाठी आम्हाला हा सामना जिंकावाच लागेल. आम्ही या आव्हानाच्या प्रतीक्षेत असून थायलंडच्या संघात चांगले खेळाडू आहेत. मात्र तरीही आमच्याकडेही चांगली संधी आहे.’
थायलंडचे प्रशिक्षक सरावुत सुक्सावांग यांनी सांगितले की, ‘भारताकडे चांगला संघ असून त्यांनी गेल्या काहीकाळामध्ये चांगली प्रगती केली आहे. दोन्ही संघ चांगला खेळेल अशी आशा आहे आणि त्यामुळेच मंगळवारी रोमांचक सामना पाहण्यास मिळेल.’