मुंबई : AFC 16 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि 2019 मध्ये होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. दक्षिण कोरियाने 1-0 अशा फरकाने भारतावर विजय मिळवला. या पराभवानंतर भारताचे कुमार खेळाडूंच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते. इतिहास घडवण्याची संधी गमावल्याचे दुःख त्यांना सलत होते. पण, खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीय फुटबॉलप्रेमींकडून कौतुकाचा वर्षावच झाला. भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने खेळाडूंना मानाचा मुजरा केला आहे.
2002 नंतर भारतीय संघाने प्रथमच AFC 16 वर्षांखालील फुटबॉल संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा उंचावल्या होत्या. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या चारही संघांना पुढील वर्षी पेरू येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळणार होता. भारतीय संघ यंदा आपल्या कर्तृत्वावर विश्वचषक पात्रता मिळवेल अशी अपेक्षा होती. मात्र, उल्लेखनीय कामगिरी करूनही भारताला अपयश आले आणि उपांत्यपूर्व फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
मात्र, फुटबॉल क्षेत्रात या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.