वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचे दडपण फलंदाजांवर प्रकर्षाने जाणवले. जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फळी असलेल्या भारतीय संघाला 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. न्यूझीलंडने पाहुण्या भारताला 139 धावांवर रोखले आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने हा सामना 80 धावांनी जिंकला. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. 9 वर्षांत भारताचा असा लाजिरवाणा पराभव झाला नव्हता.
कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. सेइफर्टने 43 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकार खेचून 84 धावा केल्या. त्याला मुन्रो ( 34), कर्णधार केन विलियम्सन ( 34), रॉस टेलर ( 23) आणि स्कॉट कुगलेंजने ( 20*) यांनी साथ दिली. भारताकडून हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.
न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला. मुन्रो व सेइफर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली, पण त्या आधीच एकदा स्टंपवरील बेल्स पडली. मुन्रो फलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेल्स पडली. पण, चेंडू टाकण्याच्या आधीच ही घटना घडली. वाऱ्याने ती बेल्स पडली आणि स्टंपचा LED लाईट पेटला. हे पाहून मुन्रोही थबकला आणि पॅव्हेलियनकडे चालायला लागला. पण ती बेल्स वाऱ्याने पडल्याचे लक्षात आले आणि तो थांबला.
MunroDecievedByTheBails_edit_1 from whatdoyouneed on Vimeo.