ठळक मुद्देभारतीय फुटबॉल संघाने इतिहास रचलाभारतीय संघाने 55 वर्षांनंतर मिळवला विजयसुनील छेत्रीचे दोन गोल; थायलंडवर 4-1 अशी मात
अबुधाबी : भारतीय फुटबॉल संघाने 3000 प्रेक्षकांसमोर रविवारी इतिहास रचला. भारतीय संघाने आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या A गटातील सलामीच्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा धुव्वा उडवला. आशियाई चषक स्पर्धेत भारताने 55 वर्षानंतर पहिल्या विजयाची चव चाखली. या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने दोन गोल करून अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याचा पराक्रम केला.
छेत्रीने 29 मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकवर गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलबरोबरच छेत्रीने बार्सिलोनाचा स्टार मेस्सीला मागे टाकले. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूंत छेत्री 66 गोलसह दुसऱ्या स्थानी आला आहे. छेत्रीने 104 सामन्यांत हा पराक्रम केला. या विक्रमात पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो 85 गोलसह आघाडीवर आहे. दुसऱ्या सत्रात छेत्रीने आणखी एक गोल केला. त्यात अनिरुद्ध थापा आणि जेजे लाल्पेखलूआ यांनी भार घातली आणि भारताला 4-1 असा विजय पक्का केला. छेत्रीने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले आहेत. 2011 च्या स्पर्धेत त्याने तीन गोल केले होते आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. "खूप आनंद होत आहे. आमच्या गटातील तिन्ही संघांकडे भरपूर अनुभव आहे, पर्यंत आमच्या खेळाडूंनी दर्जेदार खेळ केला. आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा इशारा मी स्पर्धेपूर्वी दिला होता. तंत्रशुद्ध खेळात आम्ही कमी पडू, परंतु विजयाची भूक आणि जिद्द यामुळे आमचे खेळाडू वेगळे ठरतात," असे छेत्री म्हणाला. भारताची पुढील लढत संयुक्त अरब अमिराती ( 10 जानेवारी ) आणि बहरिन ( 14 जानेवारी) यांच्याशी होणार आहे.