भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चूनी गोस्वामी यांचे ८२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९६२च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे ते कर्णधार होते. शिवाय त्यांनी बंगाल क्रिकेट संघाचेही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज सायंकाळी ५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९६२ साली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १९६४ मध्ये उपविजेतापर्यंत मजल मारली. क्लब फुटबॉलमध्ये त्यांनी मोहन बागानचे प्रतिनिधित्व केले. महाविद्यालयीन स्पर्धेत त्यांनी कोलकाता युनिव्हर्सिटी संघाचे नेतृत्व सांभाळले. त्यांनी क्रिकेट संघाचेही प्रतिनिधित्व केले.
१९५७ मध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली. राष्ट्रीय संघातील ते एक स्टार खेळाडू होते. पण, वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.
१९६६ मध्ये त्यांनी आणि सुब्रतो गुहा यांनी विक्रमी कामगिरी करताना गॅरी सोबर्स यांच्या वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला. गोस्वामी यांनी ८ विकेट्स घेतल्या.
१९७१-७२ च्या रणजी करंडक मोसमात बंगाल संघाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांनी बंगाल संघाला अंतिम सामन्यापर्यंत मजल मारून दिली, परंतु मुंबईकडून त्यांना हार मानावी लागली.