मडगाव : भारताचा अंडर १७ संघ विश्वचषकाच्या अ गटातील अमेरिका, घाना आणि कोलंबिया या संघांविरुद्ध दोन हात करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. २८ सप्टेंबरला नवी दिल्लीस रवाना होणार आहे.भारतीय संघ ६ आॅक्टोबरला अमेरिकेविरुद्ध सुरुवातीचा सामना खेळेल आणि प्रशिक्षक लुई नॉर्टन डि माटोस यांना सकारात्मक निकालाची आशा आहे.माटोस म्हणाले, ‘आमचा संघ आणि अन्य संघांत खूप अंतर आहे; परंतु जर आम्ही स्वत:वर विश्वास ठेवल्यास आम्ही विश्वचषकात विशेष ठसा उमटवू शकतो. मुलांनी गेल्या काही महिन्यांपासून कठोर मेहनत घेतली आहे आणि प्रगतीही केली आहे. त्यांनी काही सामनेदेखील खेळले आहेत. आम्हाला या विश्वचषकातून खूप आशा आहेत आणि हा अनुभव आमच्या खेळाडूंसाठी नवीन असेल. या स्पर्धेचा दर्जा खूप मोठा आहे. अन्य संघांप्रमाणेच आम्हाला याची जाण आहे. आम्ही इटली, सर्बिया, मॅसेडोनिया, मेक्सिको, कोलंबिया आणि चिलीविरुद्ध खेळलो आहोत. मेक्सिकोत चार देशांची स्पर्धा खेळलो आणि चिलीविरुद्ध ड्रॉ खेळला. त्यामुळे विश्वचषकासाठी पात्र ठरलो. चिलीविरुद्धच्या कामगिरीने संघाला आत्मविश्वास मिळायला हवा. काल मुलांनी एफसी गोवा डेव्हलपमेंटविरुद्ध सराव सामना खेळला व ते ०-१ ने पराभूत झाले. संघ नवी दिल्लीसाठी रवाना होण्याआधी स्थानिक संघाविरुद्ध आणखी एक सराव सामना खेळणार आहे.’
भारतीय फुटबॉल संघ कठोर मेहनत घेत आहे : माटोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:23 AM