मुंबई - भारतीय फुटबॉल संघाने इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्यादरम्यान खूप जिद्द आणि लवचिकता दाखवली असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले.भारताने काल रात्री फायनलमध्ये केनियाचा २-0 असा पराभव केला. त्यानंतर कॉन्स्टेनटाईन म्हणाले, ‘आशिया चषक स्पर्धेत आमच्यासमोर मोठे आव्हान असेल हे आम्हाला माहीत आहे. आम्ही फक्त संख्या वाढवत नाहीत. तेव्हाच्या आणि आताच्या कालावधीदरम्यानच्या योग्य बाबींचा आम्ही अवलंब केला, तर आमच्याजवळ साखळी फेरीतून आशियाई चषकासाठी पात्र ठरण्याची संधी आहे आणि हेच आमचे लक्ष्य आहे.’ आशिया चषक पुढील वर्षी जानेवारीत सुरूहोणार आहे आणि भारताच्या गटात यूएई, बहरीन आणि थायलंड हे संघ आहेत.ते म्हणाले, ‘आम्ही आशियाई चषकासाठी तयारी करीत आहोत आणि या स्पर्धेने आम्हाला तयारी करण्याची संधी दिली आहे. जर आम्ही आशियाई चषकात अंतिम १६ संघात स्थान मिळवायचे असल्यास अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा ठेवावी लागेल.’ कॉन्स्टेनटाईन यांनी फायनलमध्ये दोन गोल करणाऱ्या कर्णधार सुनील छेत्री आणि गोलरक्षक गुरप्रीतसिंह संधू यांचीही प्रशंसा केली.
भारतीय संघाने जिद्द दाखवली - स्टीफन कॉन्स्टेनटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 5:50 AM