मुंबई : आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाची विजयी घोडदौड गुरुवारी न्यूझीलंडने रोखली. विजयी संघात सात बदल करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या अंगलट आला. सुनील छेत्रीने गोल करून चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु बचावातील त्रुटींमुळे यजमानांना दोन गोल स्वीकारावे लागले. न्यूझीलंडने २-१ अशा विजयासह अंतिम फेरीतील शर्यतीत स्वत:ला कायम राखले. पराभवासाठी मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी वैयक्तिक चुका कारणीभूत असल्याचे सांगितले.भारताने चायनीज तैपईवर ५-० ने आणि केनियावर ३-० ने विजय नोंदविल्यानंतर विजयाची हॅट्ट्रिक साधली जाईल, असे चाहत्यांना वाटत होते. पण काल रात्री भारतीय खेळाडूंची कामगिरी ढेपाळताच स्पर्धेत पहिला पराभव पत्करावा लागला. लहान चुकांमुळे हरलो, असे मत प्रशिक्षकांनी सामन्यानंतर व्यक्त केले. दोन सामन्यात विजय नोंदविल्यानंतर संघात अतिआत्मविश्वास संचारला होता. न्यूझीलंडचा युवा संघ अत्यंत शिस्तीत खेळला. आमच्या खेळाडूंनी चुका केल्याने चांगली सुरुवात मिळू शकली नाही. दोन चुकांमुळे दोन गोल होऊ शकले नाहीत, असेही ते म्हणाले.या स्पर्धेकडे आशियाई चषकाच्या तयारीच्या दृष्टीने बघत असल्याने संघात आधीच सात बदल केले होते. आम्हाला आपेक्षित निकाल मिळू शकला नाही, पण युवा खेळाडूंना संधी देणे हे आवश्यक होते. अनुभवी सात खेळाडू बाकावर बसल्यानंतर त्यांची उणीव भरून काढणारे खेळाडू मैदानात नव्हते, असे मत कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले.
प्रयोगामुळे भारताचा पराभव , भारताचे प्रशिक्षक कॉन्स्टेनटाईन यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:46 AM