मुंबई - sleeping giants अशी ओळख असलेल्या भारतीयफुटबॉल संघाने सोमवारी 20 वर्षांखालील कॉटीफ कप स्पर्धेत विश्वविजेत्या अर्जेंटिनाला नमवून इतिहास घडविला. भारतीय संघाने सहावेळा 20 वर्षांखालील विश्वचषक उंचावणा-या अर्जेंटिनावर 2-1 असा आश्चर्यकारक विजय मिळवला. दहा खेळाडूंसह खेळूनही भारतीय संघाने मिळवलेला हा विजय फुटबॉल इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. या सामन्यात गोल करणारे दीपक तांग्री आणि अन्वर अली हे नायक ठरले. चला जाणून घेऊया भारताच्या या 'गोलवीरां'विषयी...
पंजाबच्या दीपकने मोहन बगान क्लबकडून आपल्या फुटबॉल कारकिर्दीला सुरूवात केली. 2014 मध्ये तो मोहन बगान अकादमीत दाखल झाला. त्याने मोहन बगानच्या 16, 18 व 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्वही केले आहे. सेंटर बॅक पोझिशनवर खेळणारा दीपक तीन वर्ष मोहन बगानच्या कनिष्ठ संघातील महत्त्वाचा भाग होता.
सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे लक्ष वेधले आणि भारताच्या 19 वर्षांखालील संघात स्थान पटकावले. त्याने 2017-18 मध्ये आय-लीगमध्ये पदार्पण केले. फुटबॉलपटू असला तरी दीपकला क्रिकेटचेही वेड आहे. त्याला सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावरील चित्रपट पाहायला आवडतो.
पंजाबचाच पुत्र असलेला अन्वरला घरातूनच फुटबॉलचे बाळकडू मिळाले. अन्वरचे वडील स्वतः फुटबॉलपटू होते आणि त्यांनी अन्वरला फुटबॉलचा लळा लावला. 2017 मध्ये भारतात झालेल्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत अन्वरने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने स्थानिक मिनेर्व्हा अकादमीत फुटबॉलचे धडे गिरवले.
कुटुंबीयांच्या पाठींब्यामुळेच त्याला सतत चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. अन्वर सराव करत असताना तिन्ही बहिणी त्याचे प्रोत्साहन वाढवायला मैदानावर उपस्थित असायच्या. इंडियन सुपर लीगमधील मुंबई सिटी एफसीने त्याला 30 लाख रूपयांत करारबद्ध केले आहे. 18 वर्षांखालील खेळाडूंमध्ये एखाद्याला मिळालेली ही सर्वोत्तम रक्कम आहे.
अन्वरने 68 व्या मिनिटाला केलेला अप्रतिम गोल खालील व्हिडीओत पाहा...