मडगाव : दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या दोघांच्या गोलमुळे भारताने आपली अपराजित मोहीम कायम राखली. गेल्या १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताने एकही सामना गमावलेला नाही. भारताने ११ सामन्यांत विजय आणि दोन सामन्यांत बरोबरी साधली आहे. आता भारताचा पुढील सामना मार्चमध्ये किर्गिस्तानविरुद्ध होईल.येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एएफसी आशिया चषक २०१८ च्या पात्रता फेरीतील सामना खेळविण्यात आला. या सामन्यात म्यानमारने पहिल्याच मिनिटाला गोल नोंदवून भारतीय संघाला धक्का दिला होता. हा गोल नेंग ओ याने नोंदवला. त्यानंतर क्याऊ को को याने १९ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी दुप्पट केली होती. भारताकडून सुनील छेत्रीने १३ व्या मिनिटाला गोल नोंदवून १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर जेजे याने ६९ व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली.भारताची सुरुवात निराशाजक राहिली. कारण, १७ व्या सेकंदालाच म्यानमारने आघाडी घेतली. हा फुटबॉल इतिहासातील सर्वात जलद गोलपैकी एक गोल ठरला. फातोर्डा स्टेडियमवर चेंडूला एकच किक लागली होती. अशा अवस्थेत म्यानमारने केलेली सुरुवात भारताला धक्का देणारी ठरली. थीन थान विन याने डाव्या बाजूने यान नेंग याच्याकडे चेंडू क्रॉस केला. त्याने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात ढकलला. हा गोल पाहणाºया ५५०० प्रेक्षकांमध्ये कमालीची शांतता पसरली होती. त्यानंतर भारतीय संघाने बरोबरी साधण्यात वेळ दवडला नाही. १२ व्या मिनिटाला हिलियांग बो बो याने छेत्रीला बॉक्सच्या आत पाडले. त्यामुळे भारताला पेनल्टी मिळाली. यावर कर्णधारछेत्रीने सहजरीत्या गोल नोंदवला. छेत्रीचा हा भारताकडून ५७ वा गोल ठरला. त्यानंतर ६ मिनिटांच्या अंतराने म्यानमारने गोल नोंदवून आघाडी घेतली. या वेळी भारतीय गोलरक्षक गुरुप्रीत सिंह याच्याकडूनही चूक झाली. तो चेंडूला समजू शकला नाही. लांबवरून चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याने म्यानमारला संधी दिली. भारतीय संघ मध्यंतरापर्यंत २-१ अशा पिछाडीवर होता. याचदरम्यान भारताला २९ व्या मिनिटाला गोल नोंदवण्याची संधी होती. मात्र, त्यावेळी छेत्री एकटाच चेंडू घेऊन धावत होता. अखेर त्याने चेंडू जरमनप्रीतकडे सोपवला. त्याने मारलेला फटका दिशाहीन ठरला. भारताला ८७ व्या मिनिटाला आणखी संधी मिळाली होती. छेत्रीने चेंडूला गोलजाळ्यातही टाकले होते. मात्र रेफरीने गोल देण्यास नकार दिला. कारण ही सरळ फ्री किक नव्हती.
भारताची अपराजित मोहीम कायम, म्यानमारला २-२ ने रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:36 AM