बांगलादेश : भारताने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तावर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. बांगलादेशमध्ये सॅफ फुटबॉल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानेपाकिस्तानला 3-1 असे नमवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अकराव्यांदा प्रवेश केला आहे, त्याबरोबर या स्पर्धेचे जेतेपद भारताने आतापर्यंत सातवेळा पटकावले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशनची (सॅफ) स्पर्धेची उपांत्य फेरी झाली. या सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासामध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. पण सामन्याच्या 48व्या मिनिटाला भारताच्या महावीर सिंगने गोल करत भारताच्या गोलचे खाते उघडले. त्यानंतर पुन्हा एकदा महावीरने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सुमीत पासीने भारतासाठी तिसरा गोल करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर पाकिस्तानच्या हसन बशिरने गोल केला. पाकिस्तानचा हा पहिला गोल होता आणि तरीही ते पिछाडीवर होते.
बांगलादेशच्या बंगबंधू स्टेडियम येथे हा सामना झाला. भारताला एकाही साखळी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला नाही.
साखळी सामन्यात अपराजित राहिल्यामुळे या स्पर्धेच्या 'ब' गटामध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी होता. या गटामध्ये श्रीलंका आणि मालदीव या संघांचा सहभाग होता.