मुंबई : यजमान भारतीय संघाला २-१ असा अनपेक्षित धक्का देत न्यूझीलंड संघाने इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेत खळबळ माजवली. या धमाकेदार विजयासह न्यूझीलंडने अंतिम फेरीच्या आपल्या आशा कायम राखल्या असून स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला पराभवाची चव चाखावी लागली.अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात पहिले सत्र गोलशुन्य बरोबरीत राहिले. परंतु, यावेळी न्यूझीलंडने चेंडूवर सर्वाधिक वर्चस्व राखत यजमानांनावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सत्राच्या तिसºयाच मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीने शानदार गोल करुन भारताला ४६व्या मिनिटाला १-० असे आघाडीवर नेले. यावेळी भारतीय सामन्यावर पकड मिळवणार असेच चित्र होते. परंतु, भारतीयांचा आनंद फारवेळ टिकला नाही. आंद्रे डी जोंग याने ४९व्या मिनिटाला न्यूझीलंडसाठी महत्त्वपूर्ण गोल करुन सामना १-१ असा बरोबरीत आणला.यावेळी भारतीयांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत गोल करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, किवी बचाव भेदण्यात यजमानांना सातत्याने अपयश आले. आक्रमक अपयशी ठरल्यानंतर भारताच्या बचावपटूंनी आपली जबाबदारी चोख बजावताना न्यूझीलंडला गोल करण्यापासून दूर ठेवले. परंतु, ८६व्या मिनिटाला मोसेस डायरने निर्णायक गोल करत न्यूझीलंडला २-१ असे आघाडीवर नेले आणि स्टेडियममध्ये शांतता पसरली.यानंतर न्यूझीलंडने बचावात्मक पवित्रा घेत आपल्या भक्कम बचावावर अधिक भर देत अखेरपर्यंत मिळवलेली आघाडी कायम राखली आणि दिमाखदार विजयासह अंतिम फेरीच्या आपल्या आशा कायम राखल्या. तीन सामन्यानंतर भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांनी प्रत्येकी २ विजयासह प्रत्येकी ६ गुणांची कमाई केली आहे. उत्कृष्ट गोलसरासरीच्या जोरावर भारतीय संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी कायम आहे.
इंटरकॉन्टिनेंटल चषक : भारताचा धक्कादायक पराभव, न्यूझीलंडने दिला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:38 AM