गुरप्रीतसिंग संधू लिहितात...फिफा अंडर - १७ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आज युरोपियन चॅम्पियन स्पेनचा सामना आशियाई अंडर-१६ उपविजेता इराणविरुद्ध होत आहे. या लढतीला आपण ‘क्लॅश आॅफ द टायटन्स’ असे संबोधू शकतो? माझ्या मते आपण असे समजू शकतो.आमच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्यासाठी काय करायचे हे स्पेन संघाला ठाऊक असावे. गरज नसताना प्रयत्न करणे हे स्पेनला माहिती नाही. मैदानावर संयम पाळून कठीण परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा,हे स्पेन संघाला जमते. दुसरीकडे इराण संघ वेगळाच आहे. मैदानावर कमालीची कामगिरी करीत चाहत्यांचे लक्ष या संघाने वेधले. त्यांच्या कामगिरीला ‘अनपेक्षित’ असे कुणी संबोधू शकणार नाही. कुणी अपेक्षा केली नसेल असे कठीण सामने युवा खेळाडूंच्या शानदार कामगिरीच्या बळावर इराणने जिंकले आहेत. जर्मनीला ४-० ने धूळ चारण्याची धमक केवळ इराण संघामध्येच दिसली.या सामन्यात स्पेनच्या तुलनेत इराण संघ थेट गोलजाळीवर हल्ले करेल, असे वाटते. इराण संघाला लवचिक धोरण अवलंबावे लागणार आहे. ते त्यांच्या फायद्याचेही ठरू शकते. बचावात हा संघ फारच तगडा आहे. गोलकीपर कर्णधार गुलाम अली हा तर स्वत:ची भूमिका चोख बजावित आहे. स्पेनचे लक्ष्य असेल ते इराणच्या आक्रमक फळीला थोपविणे. इराणच्या आक्रमक खेळाडूंना वारंवार रोखल्यामुळे ते कुठलीतरी चूक करतील आणि त्याचा लाभ घेत स्पेन सामना हिरावून नेईल, असे डावपेच पाहायला मिळतील.स्पेनच्या युवा खेळाडूंनादेखील स्वत:च्या क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे हे खेळाडू ‘पाहा आणि प्रतीक्षा करा’ हे धोरण अवलंबून खेळतील. स्पेनचा बचाव भेदून इराणचे खेळाडू कशी प्रतिक्रिया व्यक्त करतात, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. आतापर्यंत तरी इराण संघाने विजयाचा मार्ग स्वत: प्रशस्त केला आहे. पण प्रत्येक सामन्यात असे घडतेच असे नाही. स्पेन संघाला चेंडू सतत हलता ठेवणे आवडते. इराणच्या खेळाडूंना या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे.इराणची कामगिरी आशियाई संघांसाठी विश्वास आणि प्रेरणादायी ठरावी. इराण संघ दीर्घ काळापासून आशिया खंडाचा चेहरा बनला आहे. त्यामुळे या उपखंडातील फुटबॉल चाहत्यांची अपेक्षा इराण जिंकावा, अशीच असेल, शिवाय त्यानंतर विश्वचषकदेखील इराणने जिंकावा, असे मनोमन वाटत असावे. किमान मी तरी इराणच्या विजयाचा जल्लोष करणार आहे. (टीसीएम)
स्पेनविरुद्ध इराणने बाजी मारायला हवी, इराणच्या खेळाडूंना खेळावर विशेष लक्ष ठेवावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:49 PM