मुंबई, इंडियन सुपर लीग: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने इंडियन सुपर लीगमधील ( ISL ) क्लब केरळ ब्लास्टर्ससोबतची भागीदारी चार वर्षानंतर संपुष्टात आणली. क्लबला कायम पाठिंबा राहणार असल्याचे सांगून त्याने खेळाडूंना पुढील आव्हानांसाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला. "पुढील पाच किंवा त्याहून अधिक वर्षांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन क्लबने रचलेल्या भक्कम पायावर मजबूत इमले रचण्याची गरज आहे. संघ सहकारी आणि व्यवस्थापनाशी चर्चा करून मी सहमालकाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेत आहे," असे मत तेंडुलकरने व्यक्त केले. ISL च्या सलामीच्या सत्रापासून (२०१४) तेंडुलकर या क्लबचा सहमालक आहे. या क्लबला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही, परंतु २०१४ आणि २०१६ मध्ये त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती.