Euro 2020 : यूरो स्पर्धेत शुक्रवारी मध्यरात्री उपांत्यपूर्व फेरीचे सामने कमालीचे चुरशीचे झाले. विश्वविजेत्या फ्रान्सला धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या स्वित्झर्लंडनंफुटबॉल चाहत्यांची मनं जिंकली. तेच दुसरीकडे इटली व बेल्जियम यांच्यातल्या सामन्याचा निकाल पहिल्या सत्रातच निश्चित झाला होता. पण, विजयानंतर इटलीच्या खेळाडूंनी केलेल्या कृतीची सध्या जोरदार चर्चा आहे. बेल्जियमला पराभूत केल्यानंतर इटलीच्या खेळाडूंनी शॉर्ट्स काढल्या अन् अंडरवियरवर सेलिब्रेशन करू लागले. त्यांच्या या कृतीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडनं तीन वेळा यूरो चषक उंचावणाऱ्या आणि माजी विश्वविजेत्या स्पेनला विजयासाठी संघर्ष करायला लावला. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमर ( Yann Sommer) याची अभेद्य भिंती भेदताना स्पेनच्या स्टार खेळाडूंना घाम गाळावा लागला. ७७व्या मिनिटाला १ खेळाडू कमी होऊनही स्वित्झर्लंडनं सामना अतिरिक्त ३० मिनिटांपर्यंत खेचला अन् स्पेनला त्यातही झुंजवले. १२० मिनिटांच्या खेळातही १-१ अशी बरोबरीची कोंडी तुटू शकली नाही. स्पेनला ८ व्या मिनिटाला डेनिस झकारीयाच्या स्वयंगोलमुळे आघाडी मिळाली, ६८व्या मिनिटाला झेद्रान शकीरीनं बरोबरीचा गोल केला. त्यानंतर स्पेनचे खेळाडू प्रचंड तणावात दिसले. ७७व्या मिनिटाला रेमो फ्रेलरला लाल कार्ड मिळाला. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक सोमरनं १० गोल अडवले.