अभिजित देशमुख -दोहा : फिफा विश्वचषकात सहभागी झालेले ३२ संघ कतारमध्ये पोहोचले आहेत. कॅमेरुन, पोर्तुगाल, सर्बिया, उरुग्वे आणि ब्राझीलसह पाच संघ हे सर्वात शेवटी पोहोचले. विमानतळावर हजारो फुटबॉलप्रेमींनी ब्राझीलच्या फुटबॉलपटूंचे स्वागत केले. ३२ संघांचे प्रशिक्षण स्थळ आणि हॉटेल हे फक्त १० किमीच्या परिसरात आहे. कतार विद्यापीठ हे सर्वात आवडीचे सरावाचे ठिकाण आहे. फिफा विश्वचषकाचा आनंद घेण्यासाठी जगातील दहा लाखांपेक्षा जास्त फुटबॉलप्रेमी येण्याची आशा आहे.
यात ४० हजार अर्जेंटिनाचे आणि ३५ हजार ब्राझिलियन खेळाडू सहभागी होतील. स्पेन, इंग्लंड, आणि मेक्सिकोचे चाहतेही मोठ्या प्रमाणात पोहोचतील. कतारमध्ये जवळपास आठ लाख भारतीय आहेत. त्यात उत्तर भारतीय आहेत. आणि जवळपास दोन हजार मराठी आहेत. त्यात विश्वचषक कर्मचारी, ठेकेदार आणि स्वयंसेवकदेखील आहेत. औरंगाबादच्या आयटी इंजिनिअर दीप्ती जोशी - कुलकर्णी या स्वयंसेवक म्हणून निवडल्या गेल्या आहेत. त्यात १२ स्वयंसेवकांच्या प्रभारी आहेत. त्या फिफा फॅन फेस्टिव्हलसाठी काम करतील. फेस्टिव्हल दरम्यान संघाच्या सहकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याबरोबरच प्रेक्षकांना सहकार्य करण्याचे काम दीप्ती करणार आहेत. त्या सांगतात की, रोज जवळपास ३५ हजार फुटबॉलप्रेमी पोहोचतील. आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहोत.’
फिफा फॅन फेस्टिव्हल विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी सर्वात चांगली जागा आहे. आणि येथील वातावरण खूपच रोमांचक आहे. दीप्ती यांनी सांगितले की, कतारला जेव्हा २०२२ च्या विश्वचषकासाठी यजमान म्हणून निवडले गेले. तेव्हा आम्ही तेथेच होतो. मी आणि माझे पती तेव्हापासूनच काम करत आहोत. आम्ही जवळपास दहा वर्षांपासून येथे राहत आहोत. आणि आता कतारला काहीतरी परत करण्याची वेळ आली आहे. आणि फिफा विश्वचषक हे सर्वोत्तम माध्यम आहे.’
दीप्ती यांचे पती प्रसाद कुलकर्णी हे सर्वात मोठ्या एलएनजी उत्पादकांपैकी एकात सेवारत आहेत. कतरच्या मराठी समुदायात नागपूरच्या कौस्तुभ कोठीवान यांचाही समावेश होतो. ते टर्नस्टाइलचे व्यवस्थापन करणाऱ्या पथकाचे प्रभारी आहेत. याच प्रवेशद्वारातून सर्व तिकीटधारक स्टेडियममध्ये प्रवेश करू शकतील. अमित कर्वे आणि शंतनू देशपांडे हे कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत आणि पुण्याच्या एचआर प्रोफेशनल आसावरी देशपांडे या देखील फॅन फेस्टिव्हलमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.