नवी दिल्ली - ' सत्तर मिनट, सत्तर मिनट है तुम्हारे पास, शायद तुम्हारे जिन्दगी की सबसे खास सत्तर मिनिट; आज तुम अच्छा खेलो या बुरा, ये सत्तर मिनिट तुम्हे जिन्दगी भर याद रहेंगे !' चक दे इंडिया या चित्रपटातील प्रशिक्षक कबीर खान यांचा हा डायलॉग कानावर पडला की शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते... फुटबॉल विश्वचषक विजेत्या फ्रान्सच्या संघातही असाच एक ' कबीर खान ' आहे आणि त्याच्या प्रेरणादायी भाषणामुळेच फ्रान्स संघाने विश्वचषक जिंकला.. असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटणार नाही, पण हे खरे आहे. मॉस्कोच्या ल्युझनियाकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या लढतीत फ्रान्सने 4-2 अशा फरकाने क्रोएशियाला नमवून विश्वचषक उंचावला. 1998 नंतर त्यांनी हा पराक्रम केला. जेतेपदानंतर फ्रान्स खेळाडूंच्या विजयाचा जल्लोष सर्वांनी पाहिला. मात्र आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे आणि तो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बाद फेरीतील अर्जेंटिनाविरूद्धच्या लढतीचा आहे. यामध्ये फ्रान्सचा प्रमुख खेळाडू पॉल पोग्बा संपूर्ण जोशात आपल्या सहका-यांना प्रेरणादायी भाषण देत आहे. बाद फेरीच्या सामन्यात फ्रान्सने 4-3 अशा फरकाने गतउपविजेत्या अर्जेंटिनाचा पराभव केला होता. पॉल पोग्बा असे काय म्हणाला होता ? मला मैदानावर आज सैनिकांना पाहायचे आहे. निराश चेह-याने आपल्याला घरी जायचे नाही. विजयाच्या आनंदात मला बेधुंद व्हायचे आहे. त्यामुळे मैदानावर सर्वांनी स्वत:ला झोकून द्यावे अशी माझी इच्छा आहे. मला मैदानावर सैनिक हवे आहेत. समोर मेस्सी असो किंवा अन्य कुणी आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्हाला हा विश्वचषक जिंकायचा आहे. पाहा पोग्बाचा हा व्हिडीओ...